मनमाड : प्रतिनिधी , शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने मोठी कारवाई करत विविध ठिकाणाहून चोरलेल्या तब्बल २५ मोटारसायकलींसह दोन चोरट्यांना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे साडे सात लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत असताना चांदवड रोड परिसरात एका संशयित इसमाला होंडा शाईन कंपनीची विना नंबर प्लेट असलेली मोटारसायकल घेऊन फिरताना पोलिसांनी अडवले. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याची ओळख आकाश सुभाष राउत (वय २५, रा. चांदवड रोड, मनमाड) अशी पटली.
तपासाअंती त्याने पोलीसांना सांगितले की, त्याच्याकडे इतरही चोरीच्या मोटारसायकली असून त्याने त्या आपल्या साथीदार शुभम विशाल झाल्टे (वय २३, रा. मुरलीधरनगर, मनमाड) यांच्या मदतीने चोरल्या आहेत. या दोघांनी मिळून मनमाड, चांदवड, लासलगाव, जायखेडा, येवला, नांदगाव, धुळे आदी भागांतून मोटारसायकली चोरल्या होत्या.
पोलीसांनी या दोघांना घेऊन विविध ठिकाणी जाऊन पंचासमक्ष तपास केला असता, मनमाड, सटाणा, जायखेडा, मालेगाव, चाळीसगाव, कोपरगाव, पुलतांबा अशा ठिकाणी मोटारसायकली लपवून ठेवलेले आढळून आले. सर्व २५ मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
ताब्यात घेतलेल्या २५ मोटारसायकलींपैकी केवळ १ मोटारसायकल मनमाडची असून उर्वरित २४ मोटारसायकली बाहेरगावच्या आहेत. दरम्यान, मनमाड शहरातून आतापर्यंत सुमारे ६० मोटारसायकली चोरीस गेल्या आहेत.
ही यशस्वी कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग सतू, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
कारवाईत पोलीस निरीक्षक विजय करे, सपोनि भंगाळे, सपोनि वाघ, श्री. देवकाते, श्री. मैद, संदीप झाल्टे, रणजित वहाण, गौरव गांगुर्डे, राजेंद्र वैरणार यांचा मोलाचा सहभाग होता.
पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद मानली जात असून, शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसणार आहे.