‘एनएफबीएम’चे दृष्टिहीनांसाठी ‘दिव्यदृष्टी‘ने कार्य

राष्ट्रीय दृष्टिहीन संघ, महाराष्ट्र ही नेत्रहीनांनी नेत्रहीनांसाठी सुरू केलेली स्वयंसेवी संस्था आहे. नाशिकमध्ये सन 1995 पासून या संस्थेने दिव्यदृष्टीने लोकांसाठी काम सुरू केले. संस्थेतून प्रारंभी टंकलेखन शिक्षण दिले जात होते. आज येथे एमएससीआयटीचे संगणक शिक्षण दिले जात असून, राज्यभरातील सुमारे 30 नेत्रहीन विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी निवासी प्रशिक्षणाची सोय असून 12 कर्मचारी येथे सेवा देत आहेत. संस्थेतील संगणक प्रशिक्षणाला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून प्रमाणपत्र दिले जाते. दृष्टिहीनांना असे संगणक प्रशिक्षण देणारे महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव केंद्र ठरले आहे.

राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र ही दृष्टिहीनांसाठी दृष्टिहीनांच्या उद्धारासाठी सुरू केलेली स्वयंसेवी संस्था आहे. मुंबईत या संस्थेची मुहूर्तमेढ दि. 5 जून 1977 रोजी समविचारी नेत्रहीन बांधवांनी एकत्र येऊन केली. नेत्रहीनांच्या समस्यांची सोडवणूक करणे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे, औषधोपचारासाठी मदत करणे, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे, या आणि अशा अनेक उद्देशाने विविध उपक्रम संस्थेद्वारे नियमित राबविले जात असतात.

नाशिक येथे एनएफबीएम (दि नॅशनल फेडरेशन ऑफ दी ब्लाईंड, महाराष्ट्र) अर्थात राष्ट्रीय दृष्टिहीन संघाची नाशिक शाखा कॅनडा कॉर्नर येथे 1989मध्ये सुरू झाली. महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या काही विद्यार्थ्यांनी यामध्ये योगदान दिले. मात्र केवळ संस्था स्थापन करून दृष्टिहीनांचे प्रश्‍न, समस्या सुटणार नाहीत, यांची त्यांना जाणीव होती. त्यासाठी काही तरी करावे लागणार होते. सुरुवातीच्या काळात नेत्रहीनांसाठी कॅसेट लायब्ररी चालविली गेली.

प्रा. आर. के. रकिबे हे केटीएचएम महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांच्या बहुमोल योगदानामुळेच पुढे संस्थेचे उपक्रम व प्रकल्प वाढत गेले. सुरुवातीच्या काळात शरद पाटील, तत्कालीन आमदार गणपतराव काठे, तत्कालीन नगरसेवक लक्ष्मण सावजी यांनी संस्थेच्या पायाभरणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. विशेष म्हणजे संस्थेसाठी पूर्वी तिडके कॉलनीत मनपातर्फे भूखंड उपलब्ध करून देण्यात आला; मात्र ज्या दिवशी कार्यक्रमाचा मंडप वगैरे लावून काम सुरू होणार होते, त्याच दिवशी तेथील रहिवाशयांनी दृष्टिहीनांच्या या मानवतावादी प्रकल्पाला विरोध केला. मग शरद पाटील यांच्या प्रयत्नातून सन 1995 मध्ये संस्थेला महापालिकेतर्फे कृषीनगर जॉगिंग टॅ्रकजवळील मनोहर कॉलनीतील जागा मिळाली. प्रा. रकिबे यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे नाशिकच्या संस्थेच्या संगणक प्रशिक्षण प्रकल्पाला त्यांचेच नाव देण्यात आले.

 

प्रारंभी संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना टंकलेखनाचे प्रशिक्षण दिले जात. संस्थेचे प्रमाणपत्र त्यांना परीक्षा घेऊन दिले जात होते; पण त्याला नोकरीसाठी मान्यता नव्हती. कारण ते संस्थेचे प्रमाणपत्र होते. विद्यापीठ अथवा शैक्षणिक संस्थेचे प्रमाणपत्र नसल्याने ते ग्राह्य आणि पात्र समलजे जात नसे. पुढे ही अडचण दूर करण्यासाठी संस्थेने पुणे परीक्षा परिषद मंडळाकडे पाठपुरावा केला आणि येथील टंकलेखन शिक्षणाला अधिकृत मान्यता लाभली. संस्थेची प्रगती कासवगतीने सुरू होती; मात्र कामेही सुरूच होती. आता काळ झपाट्याने बदलत होता. दृष्टिहीनांना केवळ टंकलेखनाचे प्रशिक्षण देऊन रोजगार मिळणार नव्हते, कारण जगात संगणकाचे युग आले होते. त्यासाठी सन 2001 मध्ये संस्थेतर्फे संगणक प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्याबाहेरील विद्यार्थ्यांनाही संस्थेत राहण्या-जेवण्याच्या सोईसह निवासी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली.

टंकलेखनाच्या यंत्रासह संस्थेचे केवळ तीनच संगणक होते; मात्र दृष्टिहीनांना संगणक शिक्षण देणे प्रचंड आव्हानात्मक काम होते. जॉज नावाचे विशेष सॉफ्टवेअर संगणकात टाकून आवाज ऐकून दृष्टिहीन शिक्षण घेत. त्यांना शिक्षण देण्यासाठी मुंबईहून काही दृष्टिहीन शिक्षकच येत. नंतर डोळस शिक्षकांची नेमणूक करुन दृष्टिहीनांना प्रशिक्षण देण्यात येऊ लागले. प्रारंभीच्या काळापासून आजपर्यंत दृष्टिहीनांना शिकविणार्‍या खालकर मॅडम आजही विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.

संगणकासाठी विश्‍वासार्हता आणि अधिकृतता मिळण्यासाठी संस्थेने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात याबाबत पाठपुरावा केला. मुक्त विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांच्याकडे संस्थेचे राज्यातील महासचिव डी. पी. जाधव यांच्यासह काही लोकांनी त्यांना संस्थेतील नेत्रहीन विद्यार्थी घेत असलेले शिक्षण, प्रशिक्षणाचे कार्य दाखविले. डोळसाप्रमाणेच हे लोकही तसेच शिक्षण घेत असल्याचे पाहून डॉ. राजन वेळूकर यांनी संगणक प्रशिक्षणाला तत्त्वत: मान्यता दिली आणि दृष्टिहीनांना संगणक प्रशिक्षणे देणारे महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव केंद्र ठरले. संगणक शिक्षणाला मुक्त विद्यापीठाचे प्रमाणपत्र मिळत असल्याने शिक्षणाला परिपूर्णता व अधिकृतता आली. त्यानंतर शासनाने नोकरीसाठी अनुशेष भरती करुन रोजगार निर्माण केले त्यावेळी मुंबईतील नेत्रहीनांना नोकरी मिळाली नाही; मात्र नाशिकच्या या संस्थेतील विद्यार्थ्यांना रोजगार मिळाला. कारण त्याच्याकडे शासनमान्य संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र होते ही बाब विशेष महत्त्वाची ठरली.

550 विद्यार्थ्यांचे आयुष्य उजळले
आजवर संस्थेतून 550 विद्यार्थी शिकून स्वत:च्या पायावर उभे आहेत. आज संस्थेत मराठी आणि इंग्रजी संगणक प्रशिक्षणासह स्पर्धा परीक्षांचे ऑनलाईन आणि प्रत्यक्ष गेस्ट लेक्चरद्वारे मार्गदर्शन केले जाते. संस्थेमध्ये 12 लोकांचा कर्मचारी वर्ग काम करीत आहे. संस्थेतील नेत्रहीन विद्यार्थी येथून प्रशिक्षण घेऊन आज स्वत:च्या पायावर उभे आहेत. सरकारी आस्थापनेत शिपाईपदापासून ते अधिकारी (क्लास-2) पर्यंत आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. राज्य सेवा परीक्षेतही एका विद्यार्थ्याने यश मिळवून नोकरी मिळविली आहे. संस्था नेत्रहीन विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणासह स्वत:च्या जागेत आज विद्यार्थ्यांसाठी डॉरमेंट्री(निवास व्यवस्था), भोजन व्यवस्था देत आहे. राज्यभरातील 30 विद्यार्थी आज संस्थेत नव्या उज्ज्वल भवितव्यासाठी शिक्षण घेत आहेत.

संस्थेचे युवा सचिव जगदीप कवाळ यांचा संस्थेतील प्रवाह देखील कौतुकास्पद आहे. त्यांनी एमएसडब्ल्यू हे उच्च शिक्षण घेतले असून कला शाखेत शिक्षण घेत असतानाच ते संस्थेचे जनरल सेक्रेटरी होते. आज ते संस्थेचे युवक सचिव म्हणून उत्तमपणे जवाबदारी पार पाडत आहेत. त्यांचे नेत्रहीन, दिव्यांगासाठी नियमित कार्य सुरू असते. दिव्यांग, नेत्रहीनांना शासकीय नोकरी मिळावी, म्हणून न्यायालात दाखल केलेल्या जनहित याचिकेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली; मात्र पूर्ण नेत्रहीन लोकांना शासनात नोकरीच्या संधी मिळत नाही. त्यांना त्या मिळाव्यात म्हणून लवकरच जनहित याचिका राज्य सरकारच्या विरोधात दाखल करणार आहे. दि. 7 फेब्रुवारी 1996 पासून ते दि. 31 मार्च 2021 पर्यंत शासकीय नोकर्‍यांमध्ये जितका अनुशेष रिक्त आहे, तेथे भरती व्हावी, अशी त्यांची मागणी आहे.

सन 2006-07 मध्ये सरकारी कार्यालयात अनुशेष भरती करावी, प्रकल्पांची मान्यता या आणि अशा मागण्या तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्यासमोर मांडल्या होत्या, त्या मान्य झाल्या. यासह त्यावेळी कोर्टात नऊ हजार जागा निघाल्या होत्या. त्यातील 90 जागा दिव्यांगासाठी राखीव होत्या; मात्र त्या मिळाल्या नाहीत. म्हणून मुंबई उच्च न्यायालात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. तिची दखल घेऊन या जागा नेत्रहीनांना मिळाल्या, हा अनुभव संस्मरणीय होता असे जगदीप कवाळ सांगतात.

सुगम्य भारत योजनेत नाशिकचा समावेश झाला असूनही आज दृष्टिहीन, दिव्यांगांना अजून लिफ्टमध्ये ब्रेल लिपीतील आकडे असावेत, रॅम्पसारख्या विविध सेवा सुविधा मिळाल्या नाहीत, याची खंत व्यक्त करून त्यासाठी काम करणार असल्याचा मानस ते बोलून दाखवितात.
नाशिक येथील एनएफबीएम संस्थेला आज समाजातील दानशूर लोकांकडून निधी मिळत आहे; मात्र शासनाकडून अद्याप एक रुपयाही मिळत नाही. शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा करूनही अद्यापही काही मदत मिळाली नाही, ती मिळावी, अशी अपेक्षा जगदीप कवाळ व्यक्त करतात. संस्थेचे कार्य अधिक वेगाने आणि व्यापक व्हावे यासाठी समाजातील दानशूरांनी मदतीचा हात देऊन आमच्या पंखांत बळ द्यावे, असे आवाहनही ते ‘भ्रमर’ च्या माध्यमातून करत आहेत.

डोळस विद्यार्थ्यांप्रमाणेच दृष्टिहीन शिकतात!
संस्थेत दृष्टिहीन विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देणे आव्हानात्मक होते. संगणकाचे सुटे भाग सांगण्यापासून की बोर्ड शिकविणे, शॉर्ट कट कीज, माऊसविरहित संगणक हाताळणी याचे प्रशिक्षण देणे मोठे काम आहे. खालकर मॅडम यामध्ये निपुण आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना कसे शिकवावे याचे अनुभव मला सांगितलेे. नेत्रहीन कसे आकलन करतात, ते ज्ञान कसे ग्रहण करतात, याचा अभ्यास, अनुभव मी घेतला. संगणकाचे थेअरी ज्ञान आणि मग प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आम्ही त्यांना देतो. आम्ही डोळस व ते दृष्टिहीन असूनही केवळ संगणकाचे आवाज ऐकून ते डोळसाप्रमाणेच शिक्षण घेतात. याची पावती म्हणजे संस्थेतून शिकलेले रियाज तांबोळी हे याच संस्थेतील विद्यार्थ्यांना आज शिकवत आहेत. त्यांचे याबद्दल खूप कौतुक वाटते.

संस्थेचे कर्मचारी
पुष्पा पवार (प्राचार्य), नवनाथ शेळके ( व्यवस्थापक), सुरेखा रोकडे, अर्चना बोकेफोडे (शिक्षिका), साक्षी भरीतकर (लिपिक), संदीप पवार, भारती बोरसे, साधना भदाणे, बबन कंकाळ, कैलास यादव पाटील व रियाज तांबोळी (विविध विभागातून सेवा देणारे कर्मचारी).

नाशिक प्रकल्प संस्थेतील समिती पदाधिकारी
लक्ष्मण खापेकर(अध्यक्ष), दत्तात्रय जाधव (महासचिव), ज्ञानोबा मरडे (कोेषाध्यक्ष), प्रदीप लोंढे (सचिव), राजाराम गायकवाड( प्रकल्प संचालक), जगदीप कवाळ (युवा सचिव), चिंतामणी आहिरे, अरुणा आयचूर (कार्यकारिणी सभासद), सचिन भदाणे (नाशिक विभागीय शाखाध्यक्ष), सुरेश गांगुर्डे (ना. वि. महासचिव) हिलाल सपकाळ (ना. वि. शाखा मानद अध्यक्ष), अनिश गावित, संगीता अझादे, गोरख दरंदले, राजेंद्र देवरे (सर्व प्रकल्प समिती सभासद).

संस्थेचे राज्यभरातील महत्त्वाचे प्रकल्प
जागृती नेत्रहीन मुलींची शाळा, श्रीमती कमलाबेन मेहता अंध कन्या छात्रालय, मॉडर्न स्कूल कॅम्पस फॉर ब्लाईंड गर्ल्स. (आळंदी-देवाची, पुणे), बे्रल पब्लिशिंग सेंटर, आळंदी, पुणे, रंगलाल बाहेती अंध मुलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र, वाळुज, औरंगाबाद, ब्रेल व ऑडिओ लायब्ररी, सोलापूर, टच उत्पादन केंद्र बदलापूर, जि. ठाणे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!