नाशिक :- महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यां बाबत प्राप्त हरकतींची गांभीर्याने दखल घेत प्रभागातील परिसरात जाऊन मतदारांशी संवाद साधून मतदार यादी कर्मचाऱ्यांकडून निःपक्षपातीपणे काम होते की नाही याबाबत खात्री करण्यासाठी थेट प्रभागांमध्ये आयुक्त रमेश पवार यांनी भेटी दिल्या.

नाशिक महापालिका निवडणुकीची प्रारूप मतदार यादी २३ जून २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्याबाबत हरकती व सूचना मागविण्यात आलेल्या आहेत. महापालिकेस प्राप्त हरकती व सूचना लक्षात घेता याबाबत आयुक्त रमेश पवार यांनी त्यावर प्रभाग निहाय तपासणी करण्यासाठी पथके नियुक्त करून युद्ध पातळीवर काम सुरू आहे. यामध्ये मतदार यादी कर्मचारी हे दबावा खाली काम न करता निःपक्षपातीपणे काम होण्यासाठी पवार यांनी थेट प्रभागात जाऊन कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची तपासणी केली.

पंचवटीतील विभागातील काही प्रभागांमध्ये भेटी दिल्या. त्याचप्रमाणे रामनाथ नगर,चांभार लेण्याच्या पायथ्याशी परिसरात कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाची तपासणी करून स्वतः खात्री केली. यामुळे प्राप्त हरकती व सूचनांवर योग्य पद्धतीने कामकाज होऊन सर्व प्रभागातील याद्या सदोष तयार होऊन हरकती व सूचनांचा निपटारा होईल असा विश्वास आयुक्त रमेश पवार यांनी व्यक्त केला.