नाशिक (प्रतिनिधी) :– नाशिक महापालिकेने शहरातील सहाही विभागांत स्वमालकीचे 69 होर्डिंग्ज उभारले असून त्याव्यतिरक्त खासगी जागेत सुमारे 827 होर्डिंग्जला परवानगी दिली आहे. या होर्डिंग्जच्या माध्यमातून मनपाला एप्रिल व मे महिन्यांत सुमारे 57 लाख रुपयांचे उत्पन्न झाले आहे. सध्या पावसाळा असल्याने उत्पन्नाचे प्रमाण कमी असले तरी फेब्रुवारीत होर्डिंग्जचे नूतनीकरण असल्याने उत्पन्नात वाढ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नाशिक मनपाने शहरातील सहाही भागांत होर्डिंग्ज उभारण्यासाठी परवानगी दिली आहे. या खासगी जागेतील होर्डिंग्ज बरोबरच महापालिकेनेसुद्धा शहरात विविध ठिकाणी स्वमालकीचे होर्डिंग्ज उभारले आहेत. या होर्डिंग्जच्या माध्यमातून महापालिकेला दरवर्षी चांगलेच उत्पन्न होत असते. यंदा एप्रिल आणि मे महिन्यांत महापालिकेला 57 लाख 73 हजार 593 रुपये उत्पन्न मिळाले आहे. सध्या पावसाळा असल्याने अनेक ठिकाणी होर्डिंग्ज लावण्याचे प्रमाण अत्यल्प असते. त्यामुळे उत्पन्नावर त्याचा परिणाम होत असतो; मात्र फेब्रुवारीत खासगी जागेत लावण्यात आलेल्या होर्डिंग्जचे नूतनीकरण करावे लागत असते. त्यामुळे या काळात उत्पन्न चांगले मिळत असल्याचे सांगितले जात आहे.

त्याचबरोबर येत्या काळात निवडणुकांची धामधूम सुरू झाली तर या उत्पन्नात अजून वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या नाशिक शहरात महापालिकेने स्वमालकीचे फक्त 69 होर्डिंग्जच उभारले असले तरी 827 होर्डिंग्ज हे खासगी जागेत उभारण्यात आलेले आहेत. त्यामुळे शहरात हजारोच्या आसपास असलेल्या या होर्डिंग्जच्या माध्यमातून येत्या काळात जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू झाले आहेत, तसेच महानगरपालिकेच्या स्वमालकीच्या होर्डिंग्जच्या तुलनेत खासगी होर्डिंग्जची संख्या सर्वाधिक असल्याने येत्या काळात महापालिकेचेही होर्डिंग्ज वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.