नाशिक (राजन जोशी) – नाशिक दौऱ्यावर असलेले युवा सेनेचे अध्यक्ष माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी देवाने आजपर्यंत जे काही दिले आहे त्याचे आभार मानण्यासाठी आलो आहे असे सांगत या ठिकाणी कोणतेही राजकारण नको असेही स्पष्ट केले.

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरा करण्याचे जाहीर केले आहे त्यानुसार काल त्यांनी नाशिकमध्ये शिवसेनेच्या पदाधिकारी व शिवसैनिकांची संवादही साधला आज नांदगाव कडे रवाना होताना त्यांनी सकाळी पंचवटी येथे काळारामाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी आपण देवाने आजपर्यंत जे काही दिले आहे त्याबद्दल देवाचे आभार मानण्यासाठी आलो होतो देवाकडे काही मागण्यापेक्षा त्याचे आभार मानणे हेच महत्त्वाचे असते असे त्यांनी सांगितले तसेच नांदगाव दौऱ्यात शिंदे गटात गेलेले आमदार सुहास कांदे यांनी भेटीची इच्छा व्यक्त केली असल्याबाबत विचारले असता त्यांनी मंदिर परिसरात राजकारण नको असे सांगून या प्रश्नाला उत्तर देण्यास टाळले तसेच भेटीला तयार आहे त्यांनी मातोश्रीवर यावं आम्ही कोणासाठीही दरवाजे बंद केले नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी नाशिक शहरातील शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.