“या” 14 पालिकांची अंतिम आरक्षणाची अधिसूचनाही स्थगित

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :- राज्य शासनाने मुंबई महानगरपालिका अधिनियम आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमात सुधारणा केल्याच्या पार्श्वभूमीवर आज (ता. 5 ऑगस्ट) होणारी नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या निर्णयामुळे महापालिकांच्या निवडणुकांसाठी आरक्षणाची सोडत स्थगित करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य 14 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात येणारी अंतिम आरक्षणाची अधिसूचनादेखील स्थगित करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. औरंगाबाद, नांदेड- वाघाळा, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल आणि मीरा-भाईंदर या 9 महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या आरक्षण सोडत काढण्यात येणार होती.

ती आता काढण्यात येणार नाही. बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर या 14 महानगरपालिकांच्या आरक्षणाची अंतिम अधिसूचनादेखील प्रसिद्ध केली जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!