नाशिकरोड (प्रतिनिधी):- देवळालीगाव येथील साठे नगर येथे तीन ते चार युवकांनी काल रात्री धुडगूस घातला. घरा बाहेरील मोटरसायकलीची तोडफोड केली तर काही ठिकाणी दगडफेक केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

काल रात्री 9 वाजेच्या सुमारास तीन चार युवकांनी एमएसईबीच्या डीपीतुन लाईट बंद करून धुडगूस घालण्यास सुरवात केली. हातात लाकडी दांडे घेऊन घरा समोरील गाड्या पाडून दगडफेक करून परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही काळ चाललेल्या गोंधळामुळे महिलांनी आरडाओरड केली.

उपनगर पोलिसांना घटनेची माहिती समजताच गुन्हे शोध पथकातील अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलीस येताच या युवकांनी पळ काढला. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांना संपर्क साधला असता त्यांनी यात अल्पवयीन मुलाचा समावेश असून एका सज्ञान युवकास ताब्यात घेत त्यावर कारवाई करण्यात आली असल्याचे सांगितले.