औरंगाबाद (भ्रमर वृत्तसेवा):- औरंगाबाद शहरातील शिवाजीनगर भागातील एका 80 वर्षीय वृद्धेने एकादशीच्या दिवशीच मृत्यू हवा म्हणून चक्क अंगाला तूप लावून पेटवून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील सर्व मंडळी झोपी गेल्यावर रात्री दहा वाजेच्या सुमारास वृद्धेने हे टोकाचे पाऊल उचलले.

कावेरी भास्कर भोसले (वय 80) असे या वृद्ध महिलेचे नाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कावेरी भोसले यांना आध्यात्माची प्रचंड आवड होती. तसेच एकादशीला मृत्यू यावा, अशी त्यांची भावना होती. याबाबत त्यांनी अनेकदा कुटुंबातील सदस्यांना बोलून दाखवली होती. दरम्यान रविवारी कामिका एकादशी होती. त्यामुळे कावेरी भोसले यांनी रात्री 10 वाजेच्या सुमारास हरिपाठ म्हटला. कुटुंबातील सदस्य झोपण्यासाठी गेले असता, त्या स्वतः वरच्या मजल्यावर गेल्या. वरच्या मजल्यावर गेल्यावर कावेरी यांनी बाथरूममध्ये जाऊन आधी सुती कापड हाताला गुंडाळले. त्यावर गावरान तूप ओतले. काही तूप अंगालाही लावले. त्यांनतर काडी ओढून त्यांनी स्वतः पेटवून घेतले. तूप टाकलेले असल्याने कापडाने लगेचच पेट घेतला. ज्यात कावेरी भोसले यांचा मृत्यू झाला.

गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेल्या सततच्या आजारपणालाही कावेरी भोसले कंटाळल्या होत्या. त्यांना हृदयाचा आजार होता. त्यामुळे सुद्धा कावेरी भोसले यांनी आत्महत्या केली असावा असाही अंदाज पोलिसांना आहे.