वीजपुरवठा कट करण्याचा फोन करून 90 हजार रूपये लंपास

नाशिक (प्रतिनिधी) :- विद्युतपुरवठा कट करण्याचा बहाणा करून अज्ञात इसमाने ग्राहकाला फोन करून क्रेडिट कार्डची माहिती घेऊन परस्पर 90 हजार रुपये काढून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

फिर्यादी रविकांत कमलाकर काळे (वय 46, रा. फोर्ट, मुंबई) हे दि. 22 मे रोजी मुंबईला जाण्याकरिता त्र्यंबकेश्‍वरहून नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर बसने प्रवास करीत होते. ही बस सकाळी पावणे अकराच्या सुमारास द्वारका चौकाजवळ आली असता फिर्यादी काळे यांच्या मोबाईल फोनवर बेस्ट इलेक्ट्रिसिटी या शीर्षकाचा मेसेज पाठवून इलेक्ट्रिसिटी कट करणार असल्याचा बहाणा अज्ञात व्यक्‍तीने केला.
फिर्यादीचा विश्‍वास संपादन करून अज्ञात इसमाने तत्काळ 6295841228 या क्रमांकावर संपर्क साधण्यास सांगितले.

त्यानुसार फिर्यादीने नमूद मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्या इसमाने स्वत:चे नाव दीपक शर्मा असे सांगून फिर्यादीच्या मोबाईलवर टीम व्ह्युअर क्‍विक सपोर्ट हे अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगून हे अ‍ॅप अ‍ॅक्टीव्हेट करण्यासाठी दहा रुपयांचे पेमेंट करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी स्वत:च्या एसबीआय क्रेडिट कार्डचा वापर करून अ‍ॅपमध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरली व दहा रुपयांचे बिल अदा केले. त्यानंतर काही क्षणांत फिर्यादी काळे यांच्या बँक खात्यातून कार्डाच्या आधारे 90 हजार 338 रुपये काढून फसवणूक केली.

ही घटना द्वारका चौक ते सीएसएमटी रेल्वे स्थानकादरम्यान घडली. यादरम्यान मुंबई नाका पोलीस ठाण्यात दीपक शर्मा नामक व्यक्‍तीच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!