नाशिक (प्रतिनिधी) :– ध्रुवनगर, गंगापूर रोड येथून चोरलेली मोटारसायकल कागदपत्रांची खात्री न करता विकत घेणार्यास कोर्टाने एक वर्षाचा सश्रम कारावास व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

याबाबत माहिती अशी, की मंगेश संजय मधे (वय 20, रा. पिंपळगाव बहुला) व प्रदीप जगन्नाथ तुपे (अद्यापी फरारी) या दोघांनी ध्रुवनगर, गंगापूर रोड येथील वीरा अॅव्हेन्यू सोसायटीतून संदीप सारंगधर वरखेडे यांची हिरोहोंडा मोटारसायकल क्रमांक एमएच 21 डब्ल्यू 2713 ही चोरून त्रयस्थ व्यक्ती अक्षय विजय बेंडकुळे (वय 22, रा. पेगलवाडी, हनुमान मंदिराजवळ, त्र्यंबकेश्वर) यांना कागदपत्रांचे खोटे आश्वासन देऊन विकली होती. ही चोरी दि. 10 ऑगस्ट 2019 रोजी झाली. या प्रकरणी वरखेडे यांनी गंगापूर पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. त्यानुसार त्यावेळचे पोलीस हवालदार पी. जी. भूमकर यांनी तपास करून आरोपी मंगेश मधे व प्रदीप तुपे आणि चोरीची मोटारसायकल विकत घेणारे अक्षय बेंडकुळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. यापैकी अक्षय विजय बेंडकुळे यांनी चोरीची मोटारसायकल विकत घेतली. म्हणून कोर्टाने सीआरपीसी कलम 248 (2) अन्वये त्यांना एक वर्ष सश्रम कारावास व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला होता.
या खटल्याचे कामकाज अतिरिक्त मुख्य दंडाधिकारी, कोर्ट नंबर 4 येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्या. एम. एन. गादिया यांच्यासमोर चालले.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. फिरोज शेख यांनी काम पाहिले, तर यशस्वी तपास व गुन्ह्यात शिक्षा लागण्याच्या दृष्टीने पोलीस कॉन्स्टेबल व्ही. पी. पाटील आणि महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल बी. कापडणीस यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.