परस्पर दुसर्‍याशी भाडे करारनामा करून हॉस्पिटल व एका डेव्हलपरकडून फसवणूक

नाशिक (प्रतिनिधी) :- परस्पर भाडे करारनामा करून व खोटे दस्तऐवज तयार करून सुमारे पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरसह हॉस्पिटलच्या संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी अनिल रखमाजी चौघुले (वय 58, रा. सुयोजित गार्डन, गंगापूर रोड, नाशिक) यांनी दुसर्‍या व तिसर्‍या मजल्याच्या सजावटीसाठी 5 कोटी 2 लाख 33 हजार 912 रुपयांचा खर्च केला. त्याकरिता संशयित आरोपी जॅझ डेव्हलपर्स व त्यांचे भागीदार आणि कासलीवाल सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल व त्यांच्या भागीदारांनी महानगरपालिकेकडून आवश्यक परवानग्या काढून देण्याचे मान्य केले होते; मात्र अशा प्रकारच्या कोणत्याही परवानग्या न काढता टाळाटाळ केली.

त्यामुळे फिर्यादी चौघुले यांना व्यवसाय करता आला नाही, तसेच आरोपी जॅझ डेव्हलपर्स व कासलीवाल हॉस्पिटलच्या भागीदारांनी संगनमत करून परस्पर दुसर्‍या मजल्याचा भाडे करारनामा दुसर्‍याशी केला. शिवाय फिर्यादी यांना खोटी व दिशाभूल करणारी माहिती दिली. त्यानंतर खोटा दस्तऐवज तयार करून तो खरा असल्याचे भासवून दुय्यम कार्यालयाची दिशाभूल केली, तसेच फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 14 जानेवारी 2015 ते 15 जून 2022 या कालावधीत गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कलजवळ असलेल्या बॉस्को सेंटर येथे घडला.

संबंधित आरोपींकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर चौघुले यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली असून, आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाणे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!