येवला :– तालुक्यातील बदापूर शिवारात बिबट्यांच्या होणाऱ्या दर्शनामुळे नागरिक भयभीत झाले असतांना वन विभागाकडून पिंजरे उभारून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बदापूर परिसरात लावलेल्या अशाच एका पिंजऱ्यात बिबट्याची मादी अडकल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. परंतु, परिसरात अजूनही बिबटे असण्याची शक्यता ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. तालुक्यात गेल्या एकवीस दिवसांत जेरबंद झालेला हा दुसरा बिबट्या आहे. हा बिबट्या मादी जातीचा असून, अंदाजे दीड ते दोन वर्षाचा असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.
या बिबट्याची निफाड येथील रोपवाटिकेत रवानगी केली असून, तेथे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी केल्यानंतर बिबट्याला पुन्हा अधिवासात सोडून देण्यात येणार आहे. या अगोदर 8 जानेवारी रोजी नर जातीचा अंदाजे दीड ते दोन वर्षाचा बिबट्या जेरबंद झाला होता. दोन्ही बिबटे जेरबंद झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, यामुळे आता भीती ही कमी होणार आहे. बिबट्यासारखा हिंस्त्र प्राणी वारंवार गाव आणि शहराकडे धाव घेण्याचे प्रमाण गेल्या काही
वर्षांत वाढले आहे. येवला तालुक्यातील बदापुर व कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव हे दोन्ही गाव शेजारीच असून ऊस पिकाचे क्षेत्र वाढल्यामुळे या भागांत बिबट्यांचा वावर वाढला आहे.