Home Latest मनपा मूर्ती संकलन ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू

मनपा मूर्ती संकलन ट्रकच्या धडकेने एकाचा मृत्यू

0

नाशिक (प्रतिनिधी) :- पंचवटीतील गंगा घाटावरील म्हसोबा महाराज पटांगण परिसरात महानगरपालिकेच्या मूर्ती संकलन केंद्र म्हणून फिरणाऱ्या वाहनाने धडक दिल्यामुळे या परिसरात फिरस्ता असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर ट्रक चालक गाडी सोडून पळून गेला होता, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत उपलब्ध झालेली अधिक माहिती अशी की, अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी जागोजागी महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी मूर्ती संकलन केंद्र तयार करण्यात आलेले आहेत. असेच मूर्ती संकलन केंद्र म्हसोबा महाराज पटांगण परिसरात खाजगी ट्रक क्रमांक एम एच 15 एफ व्ही 8129 या गाडीमध्ये करण्यात आले होते. ती गाडी या ठिकाणी येत असताना या परिसरात फिरस्ता असलेल्या पुरुषाला या गाडीने जोरदार धडक दिली. अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर ती घटना येथे असलेल्या पोलिसांना समजली. पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिका बोलवून या जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने शासकीय रुग्णालयात पाठविले. परंतु डॉक्टरांनी या व्यक्तीला मृत म्हणून घोषित केले आहे. दरम्यान यातील ट्रक चालक हा ट्रक सोडून पळून गेला होता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्याचे नाव राजेंद्र झिंगाट असे असून तो विल्होळी जवळ राहणारा आहे.

यामुळे महानगरपालिकेने सुरू केलेल्या या योजनेला गालबोट लागले आहे.