कर्णबधिर मुलांच्या उत्थानासाठी मानवतेचे ‘पडसाद’

ज्यांनी कोणताच आवाज कधी ऐकला नाही आणि त्यामुळे ज्यांना बहिरेपणाचे जीवन जगावे लागले असते, अशा मुलांना शिक्षण, प्रेम व माया देणारे पडसाद कर्णबधिर विद्यालय म्हणजे मानवतेचे मंदिरच … येथे सधन नव्हे, तर गरीब झोपडपट्टीतील कर्णबधिर मुलांना शिक्षण दिले जाते. संस्थेच्या संस्थापिका सुचेता सौंदाणकर म्हणजे येथील मुलांची शिक्षिका आणि माईच… त्यांच्या संस्थेच्या प्रवासाची कहाणी जितकी कौतुकास्पद, तितकीच संघर्षाने भारलेली… पडसादच्या या प्रवासावर प्रकाश टाकणारा हा आलेख.

संस्थेच्या पहिल्या दोन विद्यार्थिनी. आता त्या संस्थेच्या कामकाजात मदत करीत आहेत.

सुचेता सौंदाणकर यांना त्यांच्या वडिलांनी सन 1998 मध्ये पुण्यातील टिळक महाविद्यालयातून बहुविकलांग विशेष मुलांसाठी शिकविण्याची पद्धती अभ्यासण्यासाठी पाठविले. त्यांची आत्या पुण्यात याच क्षेत्रात होती. शिवाय कर्णबधिरांच्या शाळेत योगदान हे सुचेताताईंना खूप आवडत होते. त्याच पावलावर पाऊल ठेवून सौंदाणकर यांनी कर्णबधिर मुलांच्या शिक्षणासाठी योगदान देण्याचा निर्णय घेऊन विशेष शिक्षण पूर्ण केले. त्याकाळी मुले कर्णबधिर आहे याची स्वीकारार्हता नव्हती. त्यामुळे मुलांचे शिक्षणाचे वय निघून जाते, मग बर्‍याच काळानंतर ही मुले शाळेत जात होती. तो काळ म्हणजे कर्णबधिर मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करण्याचा आणि त्यांच्या समस्यांबद्दल कमी जागृतीचा काळ होता. त्यामुळे अशा मुलांसाठी काही तरी करण्याची ऊर्मी ठेवून सुचेता सौंदाणकर यांनी पहिल्यांदा विशेष मुलांच्या शिक्षणाचा वसा घेतला.

संस्थेची इमारत

खरे तर त्यांना त्यावेळी सहज बँकेत नोकरी मिळू शकली असती; मात्र करिअरची मळलेली वाट न चोखाळता त्यांनी अनवट वाटेवर विशेष मुलांचे शिक्षण घेऊन त्यांच्यासाठी शाळा काढायची, ही खुणगाठ मनात बांधली आणि अशा मुलाशी लग्न करायचे, जो आपल्या या स्वप्नांना पंख देईल आणि झालेही तसेच. त्यांना सौंदाणकर सरांच्या रूपाने आयुष्याचा साथीदार मिळाला, जो त्यांच्या या मानवतेच्या उपक्रमात सहसाथीदार ठरला.

दरम्यान, शिक्षण पूर्ण करताच त्यांनी सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन या बहुविकलांगांच्या शाळेत सौंदाणकर यांच्या करिअरला प्रारंभ झाला. दि. 16 मे रोजी विवाह करून त्यांनी दि. 1 जुलै 1991 रोजी नवीन नाशिकमधील राणाप्रताप चौकात एका छोट्याशा रूममध्ये ‘पडसाद’ची मुहूर्तमेढ रोवली.

तो काळ कर्णबधिरांबद्दल सहानुभूतीचा होता. अशी मुले शिक्षण घेऊ शकत नाहीत, असा पालकांचा समज होता. अशा वातावरणात सौंदाणकर यांच्या शाळेत दोन मुलांना घेऊन हा कर्णबधिरांच्या शिक्षणाचा यज्ञ आणि आव्हानांचा प्रवास सुरू झाला होता. जागेची अडचण होती. पैशांचा मोठा प्रश्‍न. नागरी संरक्षण दलातही त्यांनी कर्णबधिर मुलांसाठी काही दिवस शाळा भरवली. त्यावेळी तेथे लोक प्रातर्विधी करत. ते सर्व साफ करून सौंदाणकर ताई तेथे शाळा भरवीत. झोपडपट्टीत सर्वेक्षण करून मजूर व श्रमिकांची कर्णबधिर मुलांना त्यांच्या ‘पडसाद’मध्ये प्रवेश देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा यज्ञ नक्कीच आव्हानात्मक होता. अशा मुलांना नाव, पत्ता, नोटांची ओळख आणि व्यवहाराचे जुजबी ज्ञान इतके तरी कळावे, असे त्यांना वाटे. मोरवाडी समाज मंदिरात नंतर काही काळ शाळा भरत होती. तत्कालीन आ. गणपतराव काठे यांच्या प्रयत्नांतून समाज मंदिरात जागा मिळाली; परंतु तेथेही काही विशिष्ट समाजातील लोकांनी शाळा भरविण्यास विरोध केला. हल्ला करून सौंदाणकर यांना त्रास दिला. कधी कधी शाळा निसर्गाच्या छताखाली झाडाखाली भरविली. अनेक स्थित्यंतरे संस्थेने पाहिली. तितकाच संघर्ष व आव्हाने सुचेताताईंनी पाहिली. राणाप्रताप चौकातून शाळा राजीवनगरला काही दिवस चालविली. सन 2006 मध्ये राणेनगरला शाळा हलविली गेली, जी आता स्वत:च्या जागेत सुरू झाली होती.

कर्णबधिर विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना सुचेता सौंदाणकर मॅडम

विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी सौंदाणकर त्याकाळी झोपडपट्ट्यांमध्ये जात. त्यावेळी त्यांना “मुक्यांची बाई आली,” असे लोक म्हणत. 30 वर्षांत 71 झोपडपट्ट्या झाल्या. आवाज ऐकून त्या घरात प्रवेश घेत आणि कर्णबधिर मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळेत पाठवा, असे सांगत असे. पैशांचा प्रश्‍न मोठा त्यासाठी दत्तक पालक योजना सुरू केली. समाजातील दानशूर लोकांच्या बळावर शाळेचा डोलारा हळूहळू उभा राहिला. जसलीन कौर गुजराल व बिना अजय बोरा यांच्यासह अजय बोरा यांनी पडसाद संस्थेला प्रचंड मोठी मदत नेहमीच केली. सर्वांत पहिल्यांदा अशी कर्णबधिर आली, की त्यांना योग्य क्षमतेचे कर्णयंत्र या मुलांना द्यावे लागते. या मुलांचे शिक्षण प्रचंड आव्हानात्मक असते. ते यामुळेच की ही विशेष मुले ऐकू शकत नाहीत म्हणून त्यांच्या कानावर कधीही शब्द गेलेले नसतात. म्हणूनच त्यांना बोलता येत नाही. त्यामुळे त्यांची पहिली तपासणी आणि कर्णयंत्र देण्याचे काम केले जाते. ऑडीओलॉजिस्टची याकामी खूप महत्त्वाची भूमिका असते. आज संस्थेत शंतनू सौंदाणकर हा त्यांचा चिरंजीव याकामी प्रचंड सुंदर काम करीत आहे.

मशीन लावले की ऐकले पाहिजे आणि बोललेच पाहिजे, असा प्रयत्न कर्णबधिर मुलांकडून करून घेतला जातो. त्यांना त्याच पद्धतीने शाळेत शिकविले जाते. यंत्र लावले की ही मुले नॉर्मल मुलांप्रमाणेच वागविली जातात. त्यांना शिक्षण जरी वेगळ्या पद्धतीने दिले जात असले, तरी त्यांना विशेष मुले म्हणून नव्हे, तर नॉर्मल मूल म्हणून वागविले जाते. त्यांना चित्रपट पाहायला नेणे, बागेत नेणे, फिरवून आणणे या आणि अशा सर्व गोष्टी नॉर्मल मुलांप्रमाणे केल्या जातात. त्यामुळे ही मुले वेगळी आहेत, असे त्यांनाही वाटत नाही. अनुभूतीवर आधारित व्यावहारिक शिक्षण देऊन या मुलांना मुख्य प्रवाहातील शिक्षणासारखेच सर्व धडे दिले जातात.

दोन मुलांपासून सुरू झालेल्या संस्थेत आज 120 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेत 8 विशेष शिक्षिका, 3 सहाय्यक शिक्षिका 32 कर्मचारी, चालक वगैरे असा मोठा स्टाफ संस्थेत काम करीत आहे. बसचे भाडे विद्यार्थ्यांचे पालक देतात; मात्र त्यापेक्षा एकही रुपया या शिक्षणासाठी घेतला जात नाही. ज्या मुलांचे पालक नाही, राहण्याची सोय नाही किंवा ते आर्थिक परिस्थितीमुळे सक्षम नाहीत, अशा मुलांना व काही पालकांनाही सौंदाणकर स्वत:च्या घरी ठेवून माया देत आहेत. गेल्या दीड महिन्यापासून काही विद्यार्थी त्यांची मूकबधिर आई सौंदाणकर मॅडमकडे राहत आहेत, हे चित्र आजच्या भौतिक युगात नक्कीच दुर्मिळ आणि अनुकरणीय असेच आहे.

प्रणय ओसवाल, कपाडिया सर, दैनिक भ्रमरचे संपादक चंदुलाल शाह हे आणि अशा काही दानशूर व्यक्ती ‘पडसाद’ला नेहमीच मदत करीत असतात. किरण वैरागकर, मेटल्डा मॅडम, पत्की, नभिंषण सर या सर्वांची संस्थेशी बांधिलकी असून त्यांचे संस्थेसाठी कार्य म्हणजे देवदूतासारखे आहे, असे सौंदाणकर कृतज्ञतापूर्वक नमूद करतात. आपले पती, तसेच वाचा उपचारतज्ज्ञ पुत्र शंतनू सौंदाणकर यांचे संस्थेत मोठे योगदान आहे, असेही त्या सांगतात.

अविस्मरणीय प्रसंग
सौंदाणकर मॅडम आजारी असताना एक प्रसंग असा घडला. त्यांच्या एका विद्यार्थ्याने घरातील सर्व औषधांची बॉक्स व आईस्क्रिम आणले होते. तो प्रसंग अत्यंत भावप्रधान होता, असे सुचेता सौंदाणकर सांगतात. या मुलांना बोलता-ऐकता येत नाही; मात्र त्यांचे सर्व कार्य योग्यच असते. असे प्रेम पाहिले, की डोळ्यांच्या कडा पाणावतात, असे त्या सांगतात. ही मुले खरेच देवाघरची गोंडस फुले असतात, त्यांना समजून घ्या, असे सांगण्यास सुचेताताई विसरत नाहीत.

‘पडसाद’चे ध्येय
‘पडसाद’मधून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सहकार तत्त्वावर एक आस्थापना किंवा संस्था काढून देण्याचे स्वप्न पडसादच्या सौंदाणकर पाहत आहेत. कर्णबधिर मुलांनी इतके अर्थार्जन करावे, की इन्कम टॅक्स भरण्याइतके उत्पन्न मिळवावे अशी संस्था काढण्याचा त्यांचा मानस आहे.

‘पडसाद’च्या इतर शिक्षकांचा अनुभव कसा..?
2002 साली शाळेच्या कार्यात जुळलेले शिक्षक म्हणतात, सौंदाणकर मॅडमने शिक्षकांना आधीच प्रशिक्षित केले. विद्यार्थ्यांच्या पालकांना आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांनाही शिक्षण दिले. ‘पडसाद’ म्हणजे सौंदाणकर मॅडम आणि सौंदाणकर परिवार म्हणजे पडसाद असे समीकरण झाले, असे येथील शिक्षक सांगतात. व्यक्ती म्हणून अत्यंत प्रेमळ असलेल्या सौंदाणकर मॅडम म्हणजे ध्येयाने प्रेरित व्यक्ती आहे, असेही येथील सर्वच कर्मचारी सांगतात. मुलांना कसे विकसित करता येईल, असा विचार सुचेता मॅडम यांच्या मनात 24 तास असतो, असे येथील सर्वच शिक्षक सांगतात. सात्त्विक स्वभावाच्या सौंदाणकर मॅडम म्हणजे संवेदनशील, दु:ख न बघवले जाणार्‍या व्यक्ती आहेत. समाजातील दु:खावर उपचार शोधा आणि कार्याला लागा, असे त्या सांगतात.

कर्णबधिरांचे मित्र व्हा…
निदान त्यांना स्मितहास्य तरी द्या
सौंदाणकर मॅडम यांच्या एका संदेशाचे समाजाने खरेच अनुकरण केले, तर कर्णबधिरांचे खर्‍या अर्थाने मोठे प्रश्‍न सुटण्यास मदत होईल. त्या म्हणतात, की कर्णबधिरांचे थोडे साईन लँग्वेज शिका, कर्णबधिर व्यक्तींना स्मितहास्य द्या. त्यांना मदत करा; परंतु त्यांना कमी लेखू नका, तर त्यांना समजून घ्या, त्यांच्याशी जमेल तसा संवाद साधा आणि त्यांच्या उत्थानात जे शक्य असेल, ते योगदान द्या. दिव्यांग, अंध व्यक्तींना जशी सिटी बसमध्ये समोरच्या दाराने चढण्याची मुभा आहे, तशीच कर्णबधिर मुलांना द्यावी आणि याचा पाठपुरावा समाजातील सक्षम व्यक्तीने करावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!