घरफोडी व वाहन चोरी करणारे पकडल्याने 7 महत्वाचे गुन्हे उघडकीस आणण्यात पंचवटी पोलिसांना यश

नाशिक :- घरफोडी व वाहन चोरी करणारे पकडल्याने 7 महत्वाचे गुन्हे उघडकीस आणण्यात पंचवटी पोलिसांना यश आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की शहरात दाखल असलेल्या घरफोडी, चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त दीपक पांडेय, उपायुक्त अमोल तांबे, सहाय्यक आयुक्त मधुकर गावित यांनी दिले. त्यानुसार 6 जानेवारी रोजी रात्री 3.30 च्या सुमारास पंचवटी पोलिसांनी सापळा लावला असतांना काळ्या पल्सर मोटरसायकलवर 2 संशयित फिरतांना दिसले. त्यांचा पोलिसांनी पाठलाग केला; परंतु ते पळून जाण्यात यशस्वी झाले.

त्यानंतर 6 फेब्रुवारी रोजी सिल्वर रंगाच्या इको चारचाकी वाहनातून संशयास्पद फिरतांना सहाय्यक पोलीस आयुक्त मधूकर गावित यांना रात्रीची गस्त घालतांना दिसून आले. गावित यांनी त्वरित नियंत्रण कक्षास कळवल्याने गस्तीवरील सर्व पोलीस वाहनांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. त्यावेळी मखमलाबाद नाक्याजवळील दुभाजकास संशयितांच्या वाहनाने धडक मारली. तेव्हा त्या वाहनातील 4 जण पळून जाऊ लागले. गुन्हे शोध पथकाच्या अंमलदारांनी त्यांचा पाठलाग करून 2 विधीसंघर्ष बालकांना ताब्यात घेतले. तसेच चिंचबन येथून झाडाझुडपात लपलेल्या इसमास धारधार हत्यारासह पकडले. सदर इसमाचे नाव रामसिंग धनसिंग भोंड (रा. भीमवाडी , सहकार नगर) असे असून पळून जाणाऱ्या त्याच्या साथीदाराचे नाव गोरखसिंग गागासिंग टाक (रा. हडपसर, पुणे) असे असल्याचे त्याने सांगितले. रामसिंग व विधी संघरशीत बालक यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या इको वाहनात धारधार प्राणघातक हत्यारे व घरफोडीची विविध साधने मिळाली.

त्यांच्याकडे तपास करता त्यांनी पंचवटीत 1 घरफोडी केल्याचे कबूल केले. या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने विक्रीसाठी त्याचा साथीदार चरणसिंग उत्तमसिंग शिकलकर याच्याकडे दिल्याचे सांगितले. पोलिसांनी चरणसिंग यास ताब्यात घेऊन चोरीस गेलेल्या मालापैकी 6 तोळे वजनाची सोन्याची लगड हस्तगत केली.

वरील टोळीने नाशिक शहरात पंचवटी 3, आडगाव 2, गंगापूर व नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी 1 असे 7 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

अटक करण्यात आलेला आरोपी रामसिंग भोंड उर्फ रामसिंग राजुसिंग जुंनी याच्या विरुद्ध सातपूर पोलीस ठाण्यात घरफोडी, दरोडा, खुनाचा प्रयत्न असा एक गुन्हा दाखल असून तो जामिनावर आहे. त्याचा साथीदार गोरखसिंग गागासिंग टाक याच्या विरुद्ध पुणे शहर व पुणे ग्रामीण जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात घरफोडीचे 27 गुन्हे दाखल आहेत.
ही आव्हानात्मक कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!