नाशिक (प्रतिनिधी) :- भंगार गोळा करणार्या युवकाचा अज्ञात इसमाने खून केल्याची घटना वडनेर भैरवजवळ घडली.
याबाबत राजेश राधेश्याम गुप्ता (वय 28, रा. कपिलवस्तू तेनुवा, जि. कृष्णानगर, नेपाळ, ह. मु. पिंपळगाव बसवंत) याने वडनेर भैरव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे, की गुप्ता यांचे पिंपळगाव बसवंत येथे भंगाराचे दुकान आहे. या दुकानात सूरज तिलक प्रजापती (वय 17, रा. कपिलवस्तू तेनुवा, नेपाळ) हा कामाला होता.
फिर्यादी गुप्ता व प्रजापती हे दोघेही एकाच गावातील रहिवासी आहेत. दि. 31 मे रोजी सकाळी साडेदहा वाजता सूरज प्रजापती हा वडनेर भैरव गावात भंगार गोळा करण्यासाठी गेला होता. त्यावेळी प्रजापती याला गावात एक अज्ञात इसम भेटला. त्या इसमाने प्रजापती याला “तुला जास्त भंगार मिळवून देतो,” असे सांगून प्रजापतीला सोबत घेऊन गेला. गावापासून काही अंतरावर असलेल्या पिंपळनारे परिसरातील जांबुटके धरणाच्या बाजूला डोंगराजवळ असलेल्या झाडाझुडपामध्ये नेले. तेथे अज्ञात इसमाने प्रजापती याच्या डोक्यात उजव्या बाजूला दगडाने मारहाण केली. त्यात प्रजापती हा जागीच ठार झाला.
दरम्यान, प्रजापती हा बराच वेळ झाला तरी पिंपळगावला परतला नाही म्हणून त्याचा मालक राजेश गुप्ता याने चौकशी केली असता त्याला प्रजापती याचा खून झाल्याचे कळले. त्यानंतर गुप्ता यांनी वडनेर भैरव पोलीस ठाणे गाठून तेथे फिर्याद दिली असून, अज्ञात मारेकर्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गवारे करीत आहेत.