पिंपळगाव बसवंत (अमोल गायकवाड) :- निफाड तालुक्यातील पाचोरे वणी येथील युवक लग्नासाठी मुलगी बघायला जात असताना पिंपळगाव-निफाड रोडला त्याच्या गाडीचा अपघात होऊन त्यात मागे बसलेल्या एका ५५ वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या अधिक माहिती नुसार शांताराम एकनाथ आव्हाड (वय २५) आणि सुकदेव रमन ससाणे (वय ५५, दोघे रा. पाचोरे वणी) हे हिरो होंडा एम एच १५ एच ए १८१६ या दुचाकीने पिंपळगावहून निफाडच्या दिशेने जात असतांना एम एच ४१ ए १७१७ या क्रमांकाच्या मालवाहतूक कंटेनरने त्यांच्या मोटारसायकल धडक दिली. या अपघातात चालक शांताराम आव्हाड यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर पाठीमागे बसलेले सुकदेव रमन ससाणे हे खाली कोसळले. त्यात त्यांच्या डोक्याला कानाजवळ गंभीर दुखापत झाली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

निफाड येथील शासकीय रुग्णालायत शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पाचोरे वणी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी संपन्न झाला. याप्रसंगी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक पावसे, पोलीस हवालदार संतोष ब्राम्हणे करत आहेत.