नाशिक (प्रतिनिधी) :– मार्केट यार्डातील किराणा दुकाना फोडून पावणेपाच लाख रुपयांचा ऐवज चोरणार्या गुन्हेगारास पंचवटी पोलिसांनी जेरबंद केले आहे.
याबाबत पंचवटी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की दि.10 मे रोजी रात्री 8 ते दि.11 मे रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान अज्ञात इसमाने शरदचंद्र पवार मार्केट यार्डातील जे.एम.ट्रेडर्स नावाच्या होलसेल किराणा दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेत केला होता. या चोरट्याने दुकानातील विविध कंपन्यांचे गोडतेलाचे 15 किलोचे 102 डबे, 5 लिटरच्या 48 कॅन, 1 लिटर वजनाचे 400 पॅकेट, 30 किलो वजनाचे साबुदाण्याचे 8 कट्टे, 10 हजार रुपये रोख असा एकुण 4 लाख 76 हजार रुपयांचे मुद्देमाल चोरुन नेला होता.
घटनेनंतर याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपीचा तत्काळ शोध घेऊन त्याला अटक करण्याच्या सुचना पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त अमोल तांबे, तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त मधूकर गावित यांनी दिल्या होत्या. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे यांनी या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश खैरनार यांच्याकडे सोपविला होता. पोलिसांनी घटनास्थळावर येणार्या-जाणार्या मार्गावरील सी सी टिव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांना घटनास्थळी एक टेम्पो संशयितरित्या पार्क केल्याचे आढळले.
हाच धागा पकडून पोलिसांनी शहरात येणार्या सर्व महामार्गावरील टोलनाक्यांचे सीसी टिव्ही फुटेज तपासले असता घोटी टोलनक्यावरुन हा टेम्पो मुंबईच्या दिशेने गेल्याचे दिसून आले. परंतू टोलनाक्यावर त्या गाडीचा नंबर मिळाला नाही. त्यामुळे गुन्हे शोधपथकाने मुंबईकडे जाणार्या महामार्गावरील हॉटेल, छोटी-मोठी दुकाने व पडघा टोलनाक्यावरील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता हे संशयित वाहन ठाण्यात गेल्याची खात्री पोलिसांना झाली.
ठाणे पोलिस आयुक्त कार्यालयातील पोलिसांनी माहिती घेतली असता, सदर संशयित टेम्पो हा कापूरबावडी मार्गे घोडबंदरच्या दिशेने रवाना झाल्याचे दिसून आले. त्यामुळे गुन्हे शोधपथकातील पोलिसांनी हा गुन्हा घडल्यापासून नाशिक येथून ठाणे व घोडबंदर परिसरात पाच वेळा जाऊन सुमारे दोनशे किलोमीटरपर्यंतचे सीसीटिव्ही फुटेज तपासले. तेव्हा हा टेम्पो मिरारोड परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांना हा टेम्पो सिल्व्हर पार्क, मिरारोड ईस्ट, ठाणे येथे दिसून आला. या गुन्ह्यातील संशयित महावीर जोहरसिंग कुमावत (वय34, रा. सिल्व्हर पार्क, मिरारोड ईस्ट, ठाणे) यांस ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने हा गुन्हा आणखी दोन साथीदारांसह केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्याला अटक करुन त्याने हा माल ज्याला विकला. त्याच्याकडून विक्रीतून मिळालेले 2 लाख 95 हजार रुपये रोख, 13 हजार रुपये किंमतीचे तेलाचे डबे, गुन्ह्यात वापरलेली 4 लाख रुपये किंमतीची टाटा एस गाडी असा एकूण 7 लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
अटक केलेल्या संशयितावर महाराष्ट्रासह इतर राज्यात एकूण 29 गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पंचवटी पोलिसांनी या सराईत गुन्हेगारास कौशल्यपुर्ण तपासाने अटक केल्याबद्दल त्यांचे पोलिस आयुक्तांनी कौतूक केले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, उपायुक्त अमोल तांबे, तत्कालीन सहाय्यक पोलीस आयुक्त मधूकर गावित, सहाय्यक पोलीस आयुक्त गंगाधर सोनवणे, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ.सिताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक रणजित नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार, दिनेश खैरनार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळनाथ ठाकरे, अशोक काकड, हवालदार सागर कुलकर्णी, पोलीस नाईक दीपक नाईक, अनिल गुंबाडे, निलेश भोईर, पोलीस शिपाई घनश्याम महाले, विलास चारोस्कर यांच्यासह नवघर पोलीस ठाणे यांच्या पथकाने केली.