नाशिक (प्रतिनिधी) :– पेठजवळील कोटंबी घाटात सापडलेल्या बेवारस मृतदेहाचे गूढ उलगडले असून, पती-पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असल्यामुळे प्रियकराच्या मदतीने पत्नीने सुपारी देऊन पतीची हत्या केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी पत्नीसह सात आरोपींना अटक केली आहे. आरोपींमध्ये दोघे सराईत गुन्हेगार आहेत.

याबाबत माहिती अशी, की दि. 25 जानेवारी रोजी पेठजवळील कोटंबी घाटात बेवारस मृतदेह आढळला होता. त्याचा तपास करताना पोलिसांच्या पथकाला मयताचे नाव सचिन श्यामराव दुसाने असे असून, तो निफाडचा राहणारा असल्याची माहिती मिळाली. त्या दृष्टीने पोलिसांनी गणेशनगर, निफाड येथे शोध घेतला असता संशयित दत्तात्रय शंकर महाजन हा तेथे आढळून आला. त्याच्याकडे मयत सचिन दुसानेबाबत चौकशी केली असता त्याने प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार मयताची पत्नी शोभा सचिन दुसाने हिने तिचा प्रियकर व सराईत गुन्हेगार संदिल किट्टू स्वामी याच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे व नंतर मृतदेह कोटंबी घाटात फेकून दिल्याची कबुली दिली. या गुन्ह्यासाठी स्विफ्ट कार क्रमांक एमएच 15 डीएम 8643 व इंडिका कार क्रमांक एमएच 04 डीएन 3593, तसेच मयताच्या नावे असलेली डस्टर कार क्रमांक एमएच 43 एडब्ल्यू 1308 या कारसह सहा मोबाईल व सुपारीची रक्कम एक लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहेत.

या प्रकरणी तपासात या गुन्ह्यात सराईत गुन्हेगार संदिल किट्टू स्वामी याला आणखी एक सराईत गुन्हेगार अशोक मोहन काळे, तसेच गोरख नामदेव जगताप (रा. नाशिक), पिंटू ऊर्फ बाळासाहेब मारुती मोगरे (रा. निफाड) व भंगार व्यावसायिक मुकर्रम जहीर अहमद (रा. नाशिक) यांनी मयत संदीप दुसाने यास त्याच्या घरी जाऊन मारहाण केली व नंतर लोखंडी वस्तूने डोक्यावर प्रहार केल्यामुळे संदीप दुसाने मरण पावला. त्यामुळे घाबरलेल्या आरोपींनी त्याच्याच मालकीच्या डस्टर कार क्रमांक एमएच 43 एडब्ल्यू 1308 मध्ये मृतदेह टाकून तो पेठजवळील कोटंबी घाटात फेकून दिल्याची कबुली सर्व आरोपींनी दिली आहे.
या प्रकरणी पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिवाणसिंग वसावे हे पुढील तपास करीत आहेत.
कोटंबी घाटात सापडलेल्या बेवारस मृतदेहाबाबत कोणतीही माहिती नसताना पोलिसांनी तपासाच्या कौशल्यावर गुन्हा उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंढे, हवालदार वसंत खांडवी, नितीन मंडलिक, हनुमंत महाले, प्रवीण सानप, पोलीस नाईक विनोद टिळे, हेमंत गरुड व सुधाकर बागूल यांच्या पथकाने गुन्ह्याचा यशस्वी तपास केला आहे.