नाशिक (राजन जोशी) :- नाशिक महानगरपालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या फाळके स्मारक महापालिकेने चालवावे का ठेकेदारी पद्धतीने चालवावे यावरून वादंग सुरू असतानाच महापालिकेच्या वतीने आजपासून फाळके स्मारक नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. त्याच बरोबर एक जुलैपर्यंत या ठिकाणी कोणताही तिकीट दर आकारण्यात येणार नसल्याचे महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले.

नाशिक शहरात पांडवलेण्याच्या पायथ्याशी असलेले फाळके स्मारक अनेक दिवसांपासून बंद आहे. हे स्मारक महापालिकेने स्वतः चालवावे की ठेकेदारी पद्धतीने चालवावे यावरून मतमतांतरे निर्माण झाली होती. अखेरीस महापालिकेने फाळके स्मारक स्वतः चालवण्याचा निर्णय घेऊन आजपासून नागरिकांसाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज सकाळी महापालिका आयुक्त रमेश पवार यांनी संपूर्ण फाळके स्मारक परिसराची पाहणी केली. या ठिकाणी सध्या उद्यानाबरोबरच तीन वेगवेगळ्या प्रकारचे रंगीबेरंगी कारंजे आणि एक धबधबा सुरू करण्यात आला आहे. त्याचबरोबर लवकरच फाळके स्मारकाच्या शेवटच्या भागात खास नागरिकांसाठी अत्याधुनिक पद्धतीचे फुड कोर्ट सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. फाळके स्मारकाच्या आवारात असलेला वॉटर पार्क सुरू करण्याबाबतही नवीन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच हा वॉटर पार्क सुद्धा सुरू होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. या ठिकाणी असलेले अॅम्फी थिएटर, सभागृह त्याचीही दुरुस्ती करून ते सुरू करण्यात येणार आहे.
आत्ता सध्या या ठिकाणी तीन कारंजे, धबधबा आणि उद्यान याचा आनंद नाशिककर लुटू शकणार आहेत. अनेक महिन्यांपासून बंद असलेले हे फाळके स्मारक आज सायंकाळी अखेरीस नागरिकांसाठी खुले होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
या पाहणी दौर्यात प्रसंगी महापालिका उपायुक्त मनोज घोड-पाटील, घनकचरा व्यवस्थापनाचे संचालक आवेश पलोड, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, उदय धर्माधिकारी, उद्यान विभागाच्या उपायुक्त मुंडे, सुनील रौंदळ जगन्नाथ कहाणे, एस. पी. जाधव, प्रकाश मोरे, सिडको विभागाचे स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे आदींसह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.