पिंपळगाव बसवंत :- पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीने दुसऱ्यांदा माझी वसुंधरा पुरस्कार हा राजस्तरीय पुरस्कार मिळविला आहे.
प्राणवायू निर्मिती करणाऱ्या वृक्षांचा ओझोन पार्क, वनराई बंधारे, भारतीय जातीच्या वृक्षांची लागवड, उद्याने, परसबाग, अंगणवाडी परिसरात सेंद्रिय भाजीपाला लागवड, कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक बंदी यासह विविध उपक्रम यशस्वीपणे राबविल्याने पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीला दुसऱ्यांदा माझी वसुंधरा पुरस्कार मिळाला.
माझी वसुंधरा अभियान 2 मध्ये नाशिक तालुक्यातील पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीला राज्यातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरपंच श्रीमती अलका बनकर व ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम यांना प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
पिंपळगाव ग्रामपंचायतीने आपल्या मेहनत आणि नियोजनबद्ध काम करण्याच्या जोरावर पुन्हा एकदा राज्यात अव्वल येण्याचा मन मिळवला. पिंपळगाव ग्रामपंचायतीने विविध अभिनव उपक्रम राबवून शहराचा कायापालट केला आहे. प्रत्येक सदस्याने वॉर्डात उद्यान, वृक्षारोपण, पिंकसिटी, सांडपाणी प्रकल्प, घनकचरा प्रकल्प, स्वच्छ व सुंदर पिंपळगाव योजना राबविण्यात आलेल्या आहेत. त्याची दखल राज्य शासनाने घेत अभियानात राज्यात पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत अव्वल असल्याची घोषणा केली.
जिल्हा परिषदेच्या सीईओ लीना बनसोड म्हणाल्या कि, 3 ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळणे ही जिल्हयासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. यावर्षी जिल्ह्यातून 96 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला होता.