पिंपळगाव घाडगा येथे वीज पडून पती पत्नीचा जागीच मृत्यू

 

इगतपुरी (प्रतिनिधी) :– इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव घाडगा येथे बेमोसमी आणि वादळी पाऊस झाला. यावेळी वीज पडून मालुंजेवाडी ता. इगतपुरी येथील पती पत्नी जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.

इगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी तातडीने पुढील कार्यवाही सुरू केली आहे. वाडीवऱ्हे पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास कार्य सुरू करण्यात आले आहे.

वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या पती पत्नीचे नाव दशरथ दामू लोते (वय 35), सुनीता दशरथ लोते (वय 30) असे आहे. हे दोघे गिऱ्हेवाडी येथील एका लग्नाच्या कार्यक्रमासाठी आले होते. वादळी पाऊस आल्याने पिंपळगाव घाडगा येथील गोपाळ किसन देवगिरे यांच्या शेतातल्या आंब्याच्या झाडाजवळ त्यांनी आसरा घेतला. मात्र दुर्दैवाने त्यांच्यावर वीज पडल्याने ते दोघेही जागीच ठार झाले.

सोबत असलेल्या मुली तेजस्विनी लोते (वय 7), सोनाली लोते (वय 5) ह्या दोघींसह गिऱ्हेवाडी येथील युवक बाळू चंदर गिऱ्हे (वय 20) हे तिघे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर एसएमबीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना आज दुपारी ४ ते ५ च्या सुमाराला घडली. घटनास्थळी पीआय अनिल पवार, पोलीस हवालदार विलास धारणकर, भाऊसाहेब भगत, निलेश मराठे, तलाठी एस. एन. रोकडे यांनी भेट देऊन कार्यवाही केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!