नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांना या वर्षीचं राष्ट्रपती पदक केंद्र सरकारने घोषित केले आहे.

केंद्र सरकारने राष्ट्रपती पदकाची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज केली. यामध्ये नाशिक पोलीस आयुक्तालयातील दत्तात्रय राजाराम कडनोर, पोलीस उपनिरीक्षक, मध्यवर्ती गुन्हेशाखा, नाशिक शहर यांच्या नावाचा समावेश आहे.

दत्तात्रय कडनोर हे पोलीस खात्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून १ जून १९९१ साली भरती झाले आहेत. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी देवळाली कॅम्प, नाशिकरोड, सरकारवाडा, भद्रकाली, विशेष शाखा, मुंबईनाका पोलीस स्टेशन व मध्यवर्ती गुन्हेशाखा येथे सेवा बजावित असतांना त्यांनी खून, चोरी, घरफोडी व दरोडा यासारख्या गंभीर गुन्ह्यांची उकल करून तपासकामी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. नाशिकरोड पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना त्यांनी १५ गावठी पिस्तोल हस्तगत केले आहेत. भद्रकाली पोलीस ठाणे येथे ६५ मोटारसायकली हस्तगत केलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या गुन्ह्यांच्या तपासांपैकी १२ गंभीर गुन्ह्यांत आरोपींना शिक्षा झालेली आहे.
पोलीस दलातील उल्लेखनीय कामगिरी करीता सन २०१७ मध्ये पोलीस महासंचालक पदक व प्रशंसापत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात आले होते. पोलीस दलात कामगिरी करतांना अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल, एम. पी.डी.ए.व मोक्का सारख्या कारवाया करून चेन स्नॅचिंग, मोटारसायकल चोरी या गुन्ह्यांत लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.
पोलीस दलातील एकूण सेवा ३२ वर्षे ७ महिने पूर्ण केलेली असून, त्यांना वेळोवेळी वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून उत्कृष्ट कामगिरीबद्दल ३७७ बक्षीसे व ३५ प्रशंसापत्र मिळाले आहेत. या केलेल्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेची केंद्र शासनाने दखल घेवून त्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे.
आरोपींची चेहरापट्टी बघून त्यांना अटक करणे व त्यांचे शोध घेणे अशी महत्त्वाची कामगिरी देखील त्यांनी यापूर्वी नाशिक पोलीस आयुक्तालयात केली आहे. त्यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्यानंतर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत खांडवी, प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत मोरे, पोलीस निरीक्षक सीताराम कोल्हे, अंचल मुदगल, आनंदा वाघ व अन्य अधिकारी आणि कर्मचार्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.