सांगली (भ्रमर वृत्तसेवा) :– मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला 1 हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडण्यात आले. रिक्षाचालकावर कारवाई न करण्यासाठी त्याने लाच मागितली होती.
मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवीशंकर चव्हाण याने एका रिक्षाचालकाकडे कारवाई न करण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी दिनांक 10 जून रोजी केली होती. त्यानंतर संबंधित रिक्षाचालकाने लाचलुचपत विभागाकडे याबाबतची तक्रार नोंदवली होती.
त्याची पडताळणी केल्यानंतर काल महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या बाहेर सापळा रचून रिक्षाचालकाकडून एका हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रवीशंकर चव्हाण यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यामध्येच रवीशंकर चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सांगलीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी दिली आहे.