सोमैय्या यांच्यावर हल्ला केलेल्या आरोपींना अटक करा : दरेकर

 

नाशिक (प्रतिनिधी) :- भाजपा नेते नितेश राणे यांना राज्य सरकार जाणून बुजून त्रास देत आहे असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला.

ते पुढे म्हणाले की, यावेळी काही झाले तरी मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता येणार आहे. माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या वर झालेला हल्ला हा निषेधार्य आहे आणि त्यातील आरोपींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.

विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे आज नाशिक दौऱ्यावर आले होते. मालेगाव येथे एका कार्यक्रमासाठी जाणार होते त्यापूर्वी ते काही काळ नाशिकमध्ये थांबले होते त्यावेळी पत्रकारांशी बोलत होते. प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, भाजप आमदार नितेश राणे यांच्या वर केलेली कारवाई ही अतिशय चुकीच्या पद्धतीची आहे. या कारवाईतून राज्य सरकारची सुडाची भावनादेखील समोर येत आहे. अशा पद्धतीप्रमाणे कुठलेही राज्य सरकारने वागणे हे योग्य नाहीये.

मुंबई महानगरपालिकेत होत असलेल्या निवडणुकीबाबत बोलताना प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, काहीही झाले तरी या निवडणुकीनंतर मुंबई महानगरपालिका मध्ये शिवसेनेची सत्ता येणार नाही. भाजपची सत्ता राहिल आणि भाजपा हा पूर्ण बहुमताने मुंबई महानगरपालिका मध्ये सत्तेत असेल. मागील वेळी भाजप नेत्यांकडून फक्त मित्र पक्ष म्हणून शिवसेनेला मदत झाली. ती चूक झाली आता ही चूक यावेळी होणार नाही. त्यामुळे शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेची सत्ता गमवावी लागेल. नाशिक महानगरपालिकेमध्ये देखील भाजपाची सत्ता येणार आहे. कोणी कितीही वाद केले आणि कोणी काहीही केलं तरी नाशिक महानगरपालिकेमध्ये देखील भाजपची सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या वर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित होता. ते संधीची वाट बघत होते असा गंभीर आरोप करून दरेकर यांनी सांगितले की, सोमय्या यांच्यावर झालेला हल्ला हा निषेधार्ह आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करावी अन्यथा भाजपला आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिला. सरकारने तातडीने पावले उचला नाहीतर परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे. दरेकर नाशिक मध्ये आल्यानंतर त्यांचे भाजपाचे शहराध्यक्ष गिरीश पालवे, लक्ष्मण सावजी, महापौर सतीश कुलकर्णी, आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले यांच्यासह अन्य मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!