मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- मुंबईसह, उपनगर आणि कोकणात पावसानं जोरदार हजेरी लावली. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळाली.यामुळं काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला. मुंबई आणि कोकणासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली. जून महिन्यात सरासरीच्या तुलनेत अल्प पाऊस झाल्यानं शेतकर्यांची चिंता वाढली होती. दरम्यान, वेधशाळेच्या अंदाजानुसार नाशिक जिल्ह्यात दि.7 रोजी 31.5 तर दि.8रोजी 97 मि.मी.म्हणजे सरासरीच्या चौपट पाऊस पडून महापूर येण्याची शक्यता आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरु झाल्यानं शेतकरी आनंदी झाले आहेत. दरम्यान, राज्याच्या अन्य भागातही पावसाची प्रतिक्षा कायम आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
एनडीआरएफच्या टीम रत्नागिरी, रायगडमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने याबाबत अंदाज वर्तवला आहे. कोल्हापूरमध्ये देखील कालपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं पंचगंगेच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. एका रात्रीत पंचगंगेची पाणी पाचळी 7 फुटांनी वाढली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 24 फुटांवर गेली आहे. त्यामुळं नागरिकांना जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे.