नवी दिल्ली (भ्रमर वृत्तसेवा):– गेल्या काही महिन्यांत इंधन, घरगुती वापराचा गॅस, खाद्य तेल आदी गोष्टींच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. महागाईचा भडका उडाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यातच आता एक नवी माहिती समोर आली आहे.
अत्यावश्यक औषधांच्या किमती एप्रिलपासून वाढणार असून, या औषधांच्या किमतीत थेट 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे. या औषधांमध्ये पॅरासिटामॉल या अत्यावश्यक औषधाचाही समावेश आहे. त्यामुळे याचा थेट फटका नागरिकांना सहन करावा लागणार आहे.
औषधांच्या किमतीही वाढणार आहेत. शेड्यूल औषधांच्या किमती वाढवण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली असून, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला 800 पेक्षा अधिक औषधांच्या किमतीत थेट 10 टक्क्यांनी वाढ होत आहे. यात पॅरासिटामॉलसह ताप, हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर, त्वचा विकार आणि अॅनिमियावरच्या उपचारांकरता वापरल्या जाणार्या औषधांचा समावेश आहे.
कोरोनाच्या साथीनंतर फार्मा इंडस्ट्री सातत्याने औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी करत होती. या पार्श्वभूमीवर शेड्यूल औषधांच्या किमतीत 10.7 टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शेड्यूल ड्रगमध्ये अत्यावश्यक औषधांचा समावेश होतो आणि त्यांच्या किमती नियंत्रित केल्या जातात.