मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी (दि. १९) मुंबईच्या बीकेसी मैदानात आयोजित करण्यात आलेल्या विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यातून जोरदार राजकीय फटकेबाजी केली. तसेच, मुंबईत सत्ता आल्यास मुंबईचा कायापालट करू, असे आश्वासन देखील पंतप्रधान मोदींनी यावेळी दिले.
यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गिकांचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर पंतप्रधान मोदींनी मेट्रोमधून प्रवासही केला. या प्रवासादरम्यान पंतप्रधान मोदींनी काही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान मोदींनी विद्यार्थ्यांना प्रवासातून वाचणाऱ्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी एक सल्ला देखील दिला आहे.

दरम्यान, या दौऱ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो ७ आणि मुंबई मेट्रो २ अ या मार्गिकांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोदींनी मेट्रोमधून प्रवासदेखील केला. मुंबई मेट्रोतून प्रवास करत असताना पंतप्रधानांनी विद्यार्थी, गृहिणी, मुंबईकर तसेच ज्यांनी मेट्रो उभी केली त्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. तसेच यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील होते.
पंतप्रधान आणि विद्यार्थ्यांमधल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आम्हाला प्रवास करायलाच दीड तास लागतो, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. यानंतर पंतप्रधानांनी आता तुमचा वेळ वाचेल, असे सांगितले. तुमचा रोजचा किती वेळ वाचेल असे पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना विचारले, तेव्हा त्यांनी ४५ मिनिते वाचतील, असे उत्तर दिले. यानंतर मोदींनी या वेळेचा काय उपयोग कराल? असे विचारले. विद्यार्थ्यांनी अभ्यास करू असे सांगितले. यानंतर मोदींनी माझ्यासाठी एक काम कराल का? १५ मिनिटे योगा कराल का? असा प्रश्न पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना विचारला. कठीण काम आहे, पण तुम्हाला स्वत:लाच करावा लागेल, असे मोदी म्हणाले. यानंतर विद्यार्थ्यांनीही पंतप्रधानांना योगा करणार असल्याचे आश्वासन दिले.
विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादादरम्यान मोदींनी विद्यार्थ्यांना योगा करण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान मोदींनी खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर ते दिल्लीला रवाना झाले. परंतु, या संवादाआधी बीकेसी मैदानावर मोदींनी विरोधकांवर जोरदार टीकास्र सोडले. तसेच, मुंबई महानगर पालिका निवडणुकांचे रणशिंग देखील मोदींनी यावेळी फुंकले आहे.
त्यावेळी बोलतांना मोदी म्हणाले की, डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्र आणि मुंबईचा अभूतपूर्व विकास होतो आहे. मुंबईला भविष्यासाठी तयार करणे ही डबल इंजिन सरकारची प्राथमिकता आहे. मुंबईकरांच्या प्रत्येक समस्येला मी समजू शकतो. भाजपाचे सरकार असो किंवा एनडीएचे सरकार असो आम्ही विकासाच्या पुढे राजकारण कधीही आणत नाही. राजकीय स्वार्थासाठी विकासात अडथळे आणत नाही, असे मोदी यावेळी म्हणाले.
https://twitter.com/narendramodi/status/1616111298131132416?s=20&t=vDSJ3_7gyyOTIEseCjSnoQ