बिहार :- बिहारमधील एका प्राध्यापकाने प्रामाणिकपणा दाखवला. कोरोना काळात दोन वर्ष नऊ महिने विद्यार्थ्यांना शिकवले नसल्याने त्यांचा 23 लाख 82 हजार रुपये इतका पगार त्यांनी परत दिला आहे. याबाबतची माहिती त्यांनी स्वत:च दिली. त्यामुळे ते सध्या खूप चर्चेत आहेत.

डॉ. ललन कुमार असे या प्राध्यापकाचे नाव आहे. तेे मुजफ्फरपूरच्या नितीश्वर कॉलेजमध्ये सहाय्यक प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नुकताच कुलसचिव डॉ आर.के. ठाकूर यांना 23 लाख 82 हजार रुपये रकमेचा धनादेश दिला. सुरुवातीला आर.के.ठाकूर यांनी प्रोफेसर ललन कुमार यांच्याकडून हा चेक घेण्यास नकार दिला.

पण नंतर त्यांनी हा चेक घेतला. डॉ. ललन कुमार यांनी सांगितले की, नितीश्वर महाविद्यालयातील माझ्या अध्यापनाच्या कामाबद्दल मला कृतज्ञता वाटत नाही. त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितलेल्या ज्ञानाप्रमाणे मी पगाराची रक्कम विद्यापीठाला सुपुर्द करतो.
त्यांनी सांगितले की, कोरोनाच्या काळात ऑनलाइन क्लास सुरू झाला होता, मात्र विद्यार्थी ऑनलाइन क्लासलाही हजर राहिले नाहीत. याबाबतची माहितीही त्यांनी विद्यापीठ प्रशासन आणि महाविद्यालय प्रशासनाला दिली.