नगर :- विवाह रखडलेल्या शेतकरी कुटुंबातील तरुणांशी बनावट विवाह करून पैसे उकळणाऱ्या व त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. बनावट वधूंसह अशा दोन टोळय़ा श्रीगोंदे व सुपा (पारनेर) पोलिसांनी पकडल्या. नगर जिल्ह्यात यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत.
यासंदर्भात रामदास शिवाजी साबळे (वय ३०, रा. भानगाव, श्रीगोंदा) यांनी फिर्याद दिली आहे. रामदास साबळे व कांचन श्रीवास्तव या दोघांचा विवाह 2 दिवसांपूर्वीच भानगाव येथील मंदिरात झाला होता. गुरुवारी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झाला. त्यावेळी टोळीने विवाहाचे आमिष दाखवत साबळे यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये उकळले व लगेच विवाह करण्याचा आग्रह धरला. त्यांच्यावर विश्वास ठेवून साबळे कुटुंबीयांनीही लगेच विवाहाची तयारी केली. विवाहानंतर लगेच 2 दिवसांत काजल उर्फ कांचन ही अजित पाटील याच्या समवेत घरातून दागिने व इतर चीजवस्तू घेऊन निघून जाताना दिसली. साबळे कुटुंबीयांनी दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर बनावट विवाहप्रकरण उघडकीस आले.
याप्रकरणी काजल उर्फ कांचन अनिल श्रीवास्तव (वय १९, रा. इकवार बाजार, वर्धा), अजित धर्मपाल पाटील (वय २२, रा. कात्री, हिंगणघाट, वर्धा), बळीराम नरोजी डबले (वय ५५, रा. वाळकेवाडी, लोहा, नांदेड), माधव काशिनाथ सोनवणे (वय ५५, रा. माळबोरगाव, किनवट, नांदेड) व दिगंबर देवराव आंबुरे (वय ३५, रा. माळबोरगाव, किनवट, नांदेड) या पाच जणांना श्रीगोंदे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आले. अधिक तपास श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले करत आहेत.
या टोळीने आणखी काही बनावट विवाह केल्याचा संशय पोलिसांना आहे. पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथील पीडित मुलाच्या कुटुंबीयांच्या सतर्कतेने बनावट वधूसह लग्नाचा देखावा करणाऱ्या दलालांना पोलिसांच्या हवाली करण्यात आले. संदीप प्रल्हाद डाखोरे (खडकी, बार्शीटाकळी, अकोले), प्रशांत योगेन्द्र गवई (बुलडाणा) अर्चना रामदास पवार (मुकुंदवाडी, औरंगाबाद) व संगीता पाटील अशी आरोपींची नावे आहेत. पीडित मुलाच्या वडिलांकडून उकळलेले सव्वा दोन लाख रुपयेही आरोपींकडून जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक डॉ. नितींकुमार गोकावे यांनी दिली.
नागरिकांनी मुला-मुलीचा विवाह करताना दोन्हीकडचे नातेवाईक, मुला-मुलीची ओळख, त्यांचे गाव, पत्ता, शिक्षण, नोकरी याबाबत व्यवस्थित चौकशी करून माहिती घ्यावी. जेणेकरून अशा प्रकारे फसवणूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले यांनी केले आहे.