नाशिक (प्रतिनिधी) :- येथील दगडू तेली चांदवडकर नावाने प्रसिद्ध असलेल्या दुकानांपैकी सुखलाल दगडू तेली चांदवडकर दुकान क्रमांक 3, सुकामेवा व काष्ट औषधी या दुकानात वन्यजीवांचे अवयव सापडल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
रविवार कारंजा, तेली गल्ली परिसरात दगडू तेली नावाने काही दुकाने आहेत. यापैकी दीपक सुरेश चांदवडकर यांच्या मालकीच्या सुकामेवा व काष्ट औषधी, वनस्पती दुकान नंबर 3 या दुकानात वन्यजीव अवयव मिळतात, अशी गुप्त खबर्यामार्फत माहिती मिळाल्यामुळे वन खात्याचे नाशिकचे वन परिक्षेत्र अधिकारी, तसेच राऊंड स्टाफच्या अन्य अधिकारी व कर्मचार्यांनी या दुकानावर दि. 4 जुलै रोजी धाड टाकली. यावेळी दुकानात विविध प्रकारच्या वन्य प्राण्यांचे अवयव मिळून आले.
त्यामुळे वन खात्याने वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कलम 9 आणि कलम 39 चा भंग केल्याच्या आरोपावरून दीपक चांदवडकर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. दुकानात आढळलेले वन्य प्राण्यांचे अवयव कोणत्या प्राण्याचे आहेत, हे ओळखण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे वन खात्याच्या अधिकार्यांनी सांगितले.
यापूर्वीही नाशिकमध्ये अशा धाडी पडल्या आहेत; मात्र प्रसिद्ध दुकानात धाड पडल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.