जुदो चॅम्पियनशिप स्पर्धेत रायगड संघाला विजेतेपद

नाशिक (प्रतिनिधी):- नाशिक जिल्हा जुदो असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र जुदो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या 2 र्‍या महाराष्ट्र राज्यस्तरीय जुदो चॅम्पियनशिप लीग स्पर्धेमध्ये खेळल्या गेलेल्या अत्यंत चुरशीच्या अंतिम लढतीत रायगड चॅलेंजर्स संघाने 4-4 अश्या बरोबरीनंतर अंतिम सामन्यात विजय मिळवत या स्पर्धेचे विजेतेपदावर आपले नांव कोरले.

रायगडकडून आकांक्षा शिंदे (नाशिक) आणि रेवती साळुंके ( सांगली) यांच्यातील ही लढत अत्यंत चुरशीची झाली. सुरवातीला दोन्हीही खेळाडूनी सय्यमाने खेळ केला. मात्र त्यानंतर आकांक्षा शिंदेने आक्रमक पवित्रा घेत रेवतीला आपल्या खांद्यावर उचलून घेत ओगोशीचा सुंदर डाव टाकून रेवतीला चीत करण्यात यश मिळीवले आणि ही लढत जिंकून आपल्या संघाला या स्पर्धेचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका पार पडली. विजेत्या रायगड संघांला प्रमुख पाहुणे पोलिस निरीक्षक रणजित नलावडे, जेष्ठ जुदो संघटक दिवंगत भास्कर पटवर्धन यांची कन्या गौरी पटवर्धन, यशवंत व्यायाम शाळेचे अध्यक्ष दिपक पाटील, राज्य जुदो असोसिएशनचे खजिनदार रवींद्र मेतकर, क्रीडा संघटक आनंद खरे, सईचे प्रशिक्षक विजय पाटील यांच्या हस्ते आकर्षक चषक, रोख रुपये एक लाख आणि प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. तर उपविजयी अंनकाई संघाला आकर्षक चषक, पन्नास हजार रुपये, तर तीसर्‍या क्रमांकाच्या लोहंगड संघाला चषक आणि तीस हजार रुपये प्रदान करून गौरवण्यात आले.

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगरी करणार्‍या आदित्य धोपावकर (नगर) याला सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू तर महिलामध्ये आकांक्षा शिंदे (नाशिक) हिला सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू म्हणून जुदोचे राष्ट्रीय खेळाडू आणि प्रसिद्ध उद्योजक सुरेश कापडिया यांच्यातर्फे प्रत्येकी पाच हजार रुपये देवून गौरवण्यात आले. या स्पर्ध्याची तांत्रिक बाजू स्पर्धेचे संचालक अमोल देसाई, रवींद्र मेतकर, विजय पाटील, योगेश शिंदे, स्वप्नील शिंदे, सुहास मैद, माधव भात, अजिंक्य वैद्य, दुर्गा जाधव, संजू पाठक गौरव पगारे आणि त्यांचे सहकारी यांनी यशस्वीरीत्या सांभाळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!