नाशिक (चंद्रशेखर गोसावी) :- गुरुवारपासून जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीन धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सततच्या पावसामुळे गोदावरी नदीला पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून इगतपुरी येथील पर्यायी रस्ता वाहून गेल्यामुळे पंधरा गावांचा संपर्क तुटला आहे. सुरगाणा तालुक्यातील दोन पुल पाण्याखाली गेले आहेत. सततच्या पावसामुळे शेतीच्या कामाला देखील आता वेग आला आहे. पावसामुळे कुठलीही दुर्घटना झाली नसल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झाला असून नाशिक-मुंबई, नाशिक-पुणे या मार्गांवर वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पाऊस सुरू झाल्यापासून मृग आणि आद्रा या दोन नक्षत्रांत अल्प पाऊस झाल्यामुळे पुनर्वसू नक्षत्रात तरी पाऊस होतो की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. गुरुवारपासून सुरू झालेल्या पुनर्वसू नक्षत्रात जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे जिल्ह्यात समाधानाचे वातावरण नागरिकांमध्ये दिसून येत आहे. मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा 48 टक्के झाला आहे . मागील 24 तासांमध्ये नाशिक जिल्ह्यात 77.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती नाशिक वेधशाळेने दिली आहे. येणार्या 24 तासांमध्ये देखील असाच पाऊस होण्याची शक्यता वेधशाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. काल रात्री आठ वाजेपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे नाशिक शहरातून वाहणार्या गोदावरी नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे मापदंड असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागल्याने नदीकाठच्या भाजी बाजार, बालाजी कोट, यशवंतराव महाराज पटांगण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले होते. तसेच या पावसामुळे शहरातील जनजीवनावर देखील परिणाम झाला आहे. तसेच शहरातील नासर्डी नदी देखील भरून वाहत होती.
याच बरोबर शहरातील वाघाडी व इतर नद्यांना देखील पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. दुपारी दोन वाजता गंगापूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याने 1000 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन देखील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सुरगाणा तालुक्यातील पळसन व आमटी नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. सुरगाणा तालुक्यात जोरदार पाऊस काल सकाळपासून सुरू असल्यामुळे सुरगाणा तालुक्यातील नदी नाले देखील तुडुंब भरून वहात आहे.
गंगापुर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मागील 2 दिवसांपासून अतिवृष्टी होत असून गंगापुर प्रकल्पाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रामधुन गोदावरी नदीमधे होळकर पुलाजवळ 7000क्युसेक्स इतका विसर्ग सुरु आहे. पाऊसचा जोर पुढचे काही दिवस असाच रहाणार असल्याने गंगापुर धरणामधून आज दुपारी 12 वाजता 3 हजार क्यूसेक्स विसर्ग करण्यात येऊन तो आवश्यकतेनुसार टप्याटप्याने वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे होळकर पुलाजवळ गोदावरी नदीत पाण्याची पातळी वाढणार असल्याने नाशिक शहरातील गोदावरी नदीकाठच्या नागरीकांनी सतर्क रहावे अशा सुचना नागरीकांना प्रशासनामार्फत देण्यात येत आहे. कडवा धरणातून दुपारी 1 वाजता 4 हजार 150 क्यूसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे. तोही आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाढविला जाऊ शकतो.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील मुकणे 50.56, वाकी 9.87, भाम 46.6, भावली 64.92 ,वालदेवी 15.9, गंगापूर 55.22, गौतमी गोदावरी 40.69, कश्यपी 30.62, कडवा 68.90, आळंदी 43.50, भोजापुर 5.26, पालखेड 48.55, करंजवण 44.22, ओझरखेड 38.50, वाघाड 54.47, तिसगाव 0, पुणेगाव 69.82, नांदूर मध्यमेश्वर 0, चणकापुर 44.87, हरणबारी 66.47, केळझर 19.76, नाग्यासाकी 3.78 दक्षलक्ष पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. नांदूर मधमेश्वर बंधार्यातून 14,409 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये 47.77 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी हाच पाणीसाठा 22.95 टक्के इतका होता.
इगतपुरी तालुक्यात विक्रमी 250 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक नदी, नाले दुथडी भरून वाहू लागल्याने धरणांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दारणा धरण 67.21 टक्के भरल्याने धरणातून 5.898 क्युसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. तसेच तालुक्यातील सर्व धरणांमधून फक्त दारणा धरणातून विसर्ग करण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता सुरेश जाचक यांनी दिली आहे. इगतपुरी तालुक्यात सततच्या पावसामुळे आता शेतीच्या कामाने देखील वेग घेतला असून भात लावणीच्या कामाला वेग वाढला आहे. त्याचबरोबर इतर पिकांची पेरणी देखील शेतकर्यांनी सुरू केली आहे
इगतपुरी तालुक्यातील अस्वली मुंडेगाव रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे जो पर्यायी रस्ता करण्यात आला होता तो रस्ता पावसामुळे वाहून गेल्याने अस्वली बेळगाव कुर्हे यासह दहा ते पंधरा गावांचा संपर्क तुटला आहे. हा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी युद्ध पातळीवरती काम सुरू असून त्याला पावसाची अडचण निर्माण होत असल्याचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी सांगितले.
खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत
सतत सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक-मुंबई महामार्गावर इगतपुरी वाडीवर्हे या दरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाल्याने आणि या परिसरात पाऊस जोरदार असल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू होती तर नाशिक पुणे महामार्गावर देखील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नाशिक पुणे महामार्गावर सिन्नर, शिंदे दरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाल्यामुळे वाहतूक या ठिकाणी देखील विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
पाणी कपात टळली; नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा : चव्हाणके
नाशिक शहरामध्ये पाणी कपात लागू करण्यासाठी आज सोमवारी महापालिका आयुक्त रमेश पवार हे महापालिकेतील सर्व अधिकार्यांची बैठक घेणार होते आणि त्यावर निर्णय घेणार होते. परंतु सातत्याने झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. धरण साठाा मध्ये वाढ झाल्यामुळेे नाशिककरांची सध्या तरी टळली आहे. तर अजूनही गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा आवश्यक आहे, येणार्या दिवसांत नागरिकांनी पाण्याचा वापर करताना तो काटकसरीने करावा असे आवाहन अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी केले आहे.