मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):-तीन दिवस आधीच केरळात मान्सून दाखल झाल्यानंतर, महाराष्ट्रात देखील वेळेआधीच मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. पण वेळ निघून गेल्यानंतरही अद्याप महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झालेले नाही. त्यामुळे हवामान विभाग पुन्हा एकदा तोंडघशी पडलं आहे. यानंतर आता आयएमडीने महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा नवा मुहूर्त काढला आहे.
12 जून रोजी महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली आहे. सध्या कर्नाटक आणि गोव्याच्या सीमेवर मान्सून रेंगळला असून नैऋत्य मोसमी वार्याच्या पुढील वाटचालीस अडथळे निर्माण होत आहेत.

पुढील काही दिवसांत मान्सूनच्या आगमनासाठी महाराष्ट्रात पोषक हवामान तयार होईल, परिणामी 12 जूनपर्यंत राज्यात मान्सून दाखल होईल, अशी नवी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
