मुंबई : सर्व मशिदींवरील भोंगे उतरवण्याबाबत राज ठाकरेंनी राज्य सरकारला ३ मे चा अल्टिमेटम दिला होता. त्यात औरंगाबादमधील 1 मे रोजी झालेल्या सभेसंदर्भात राज ठाकरेंविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे भोंगे उतरवण्याबाबत नेमकी काय भूमिका घेतात, याविषयी उत्सुकता ताणली गेली होती. याबाबत राज ठाकरेंनी ट्विटर द्वारे जाहीर पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

या पत्राच्या माध्यमातून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर देखील निशाणा साधला आहे. “महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत हे सांगितलेले आपण ऐकणार आहात, की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बैगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊनच जाऊ दे”, असे आव्हानच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना दिले आहे.

राज ठाकरे यांनी दिलेल्या अल्टीमेटमला काही तास बाकी असताना त्यांनी एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. ‘आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही, त्यांना एकदा हनुमान चालीसा ऐकवाच’ असे म्हणत राज ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम आहेत.
https://twitter.com/RajThackeray/status/1521498072517582849?t=YVQbPIpO7o7mZiKS8ssJzA&s=19
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादेत गुन्हा दाखल झाला आहे. तर पोलीस यंत्रणा आणि राज्य सरकार कडक पावले उचलण्याच्या तयारीत आहे.