विश्‍व ब्रीज स्पर्धेसाठी राशी जहागीरदार भारतीय संघात

नाशिक (प्रतिनिधी):– 7 ते 14 ऑगस्ट, 2022 दरम्यान इटली येथे 7 व्या विश्‍व ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये उप कनिष्ठ गट, कनिष्ठ आणि यूथ गट अश्या तीन गटांचा समावेश आहे. यामध्ये उपकनिष्ठ (16 वर्षे) गटाच्या संघामध्ये नाशिकच्या फ्रवशी इंटरनॅशनल स्कूलची खेळाडू राशी सागर जहागीरदार हिची भारताच्या संघामध्ये निवड झाली आहे. राशीबरोबर या गटामध्ये मुंबईचा पावन गोयल, कर्नाटकचा कर्तीकेयन मुत्थुस्वामी आणि कलकत्ताचा तिर्थराज चक्रवर्ती या खेळाडूंचा भारताच्या संघामध्ये समावेश आहे.

राशीच्या या निवडीबद्दल तिचा फ्रवशी इंटरनॅशनलचे संचालक रतन लथ, मुख्याध्यापक यांनी सत्कार केला आणि शुभेछ्या दिल्या. राशीची आई डॉ. विशाखा जहागीरदार स्वतः डॉक्टर आहेत. आईने मला संपूर्ण सहकार्य केल्यामुळे आणि माझ्या शाळेने मला सर्व प्रकारची मदत केल्यामुळे मला हे यश मिळवता आले आहे अश्या भावना राशीने व्यक्त केल्या. इटलीत आयोजित या 7 व्या विश्‍व स्पर्धेत सहभागी होणार्‍या भारताच्या संघामध्ये एकूण 22 खेळाडूंचा समावेश असून या संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून नाशिकच्या हेमंत पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर प्रशिक्षक म्हणून अनिरुद्ध सांजगिरी, विनय देसाई, बिंदीया नायडू, सत्यकुमार आयगार आणि केशव सामंत हे असणार आहेत. ब्रीज हा संपूर्ण बुद्धीचा खेळ आहे. भारताच्या ब्रीज संघाने याआधी वरिष्ठ विश्‍व स्पर्धेत रौप्य पदक, आशियाई स्पर्धेत एक सुवर्णपदक आणि दोन कास्य पदकांची कमाई केली आहे.

प्रशिक्षकांनी या खेळाडूंकडून चांगला सराव करून घेतला आहे, त्यामुळे हे खेळाडू भारतासाठी चांगली कामगरी करतील असा विश्‍वास हेमंत पांडे यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!