मुंबईजवळ संशयास्पद बोटीबाबत, ‘ही’ नवीन माहिती आली समोर

मुंबईच्या जवळ संशयास्पद बोट आढळली. मुंबई समुद्र किनाऱ्यापासून 42 नोटिकल्स मैल अंतरावर संशयास्पद मासेमारी नौका आढळली आहे. या संशयास्पद बोटीबाबत आता नवीन माहिती समोर आली आहे. मुंबई आणि पालघर किनारपट्टी पासून ४४ नौटीकल मैलावर तटरक्षक दलाने पकडलेल्या बोटीत कोणीही पाकिस्तानी खलाशी नाहीत, हा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचा खुलासा या बोटीला अर्थसाहाय्य करणाऱ्या उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने केला आहे.

आज सकाळच्या सुमारास एक संशयास्पद बोट आढळली असल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली. त्यानंतर नौदल आणि तटरक्षक दलाचे अधिकारी या बोटीचा शोध घेत होते. आज सकाळी साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास बोट दिसल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. ही बोट नौदलाच्या हद्दीत आढळली. त्यामुळे नौदलाकडून कारवाई होणार असल्याचे सांगण्यात आले होते. या बोटीत पाकिस्तानी नागरीक असल्याची माहिती समोर आल्याने अनेक तर्क लढवले जात होते.मात्र, त्याबाबत आता नवी माहिती समोर आली आहे.

जलराणी’ ही बोट उत्तन मधील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची आहे. दोन वर्षांपूर्वी तिला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत अर्थसाहाय्य केले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष लिओ कॉलासो यांनी दिली आहे.

आज सकाळी ही बोट तटरक्षक दलाच्या जवानांनी त्यात पाकिस्तानी नागरिक असल्याच्या संशयावरून पकडली होती. मात्र यातील सर्वच्या सर्व पंधरा खलाशांची आधार कार्ड आमच्याकडे असून त्यात कोणीही पाकिस्तानी नागरिक नाही असेही कोलासो यांनी स्पष्ट सांगितले.

सदरची बोट ही मासेमारीसाठी गेली असून ती संपर्काबाहेर असल्याने तिच्या अलीकडे असणाऱ्या निर्गम या बोटीवरून जलराणी बोटिशी संपर्क साधण्यात आला आहे. या बोटीने उत्तन किनारी तिने परतावे अशा सूचना दिल्या गेल्या आहेत असं कोलासो यांनी सांगितलं.

ही बोट मासेमारीसाठी सुमारे साडेचार किलोमीटर क्षेत्रात जाळे टाकून असल्याने ते गुंडाळून घ्यायला पाच तास आणि परत येण्यासाठी किमान दोन आणखी तास लागतील असे ही लिओ कोलासो यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!