नाशिक :- शहरातील द्वारका परिसरातील वृंदावन कॉलनीत असलेल्या एका मत्स्यालयावर छापा टाकत पश्चिम वन विभागाने दुर्मिळ तसेच वन्यजीव संरक्षण श्रेणीतील वन्यजीवांची सुटका केली आहे.
याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना दहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, द्वारका परिसरातील वृंदावन कॉलनीमध्ये स्टार नावाचे मत्स्यालय आहे. या ठिकाणी 40 दुर्मिळ असे वन्यजीव असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे नाशिकचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, रोहयो व वन्यजीवचे सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार व फिरत्या पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. बी. पाटील व इतर रेंज स्टाफने द्वारका परिसरातील वृंदावन कॉलनीतील स्टार अॅक्वेरीयम दुकानावर धाड टाकून झडती घेतली.
याठिकाणी दुर्मिळ जातीचे स्पाॅटेड पाँन्ड कासव- 2, रिव्हर क्राऊन टर्टल-10, स्टार बॅक टर्टल-3, रेड इअर्ड स्लायडर टर्टल- 3, पचमॅन फ्राॅग (बेेडूक) -2, हेड्गहाॅग- 4, रिंगनेक पॅराकिट – 1, अॅलेक्झांडमॅम पॅराकिट – 15 हे वन्यजीव आढळले. सुटका करण्यात आलेले वन्यजीव शेड्युल्ड एक ते पाचमधील असून त्यांची खरेदी विक्री करण्यास तसेच, ती जवळ बाळगणे, पाळण्यास बंदी आहे. यावेळी करण्यात आलेल्या तपासणीत हे वन्यजीव सापडले आहेत.
याप्रकरणी वसिम चिरागोद्दीन शेख (वय ३८) व फारुख चिरागोद्दीन शेख (वय ३४, रा. अलफहत सोसायटी, प्लॉट नं. ९, पखाल रोड, व्दारका, नाशिक) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यामध्ये आंतर राज्य टोळीचा समावेश असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्या अनुषंगाने तपासकार्य सुरु आहे.