शेतकऱ्यांना दिलासा: सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर; मंत्रिमंडळ बैठकीतील मोठा निर्णय

मुंबई: आज मुंबईत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात येत आहेत. महत्त्वाचं म्हणजे अवकाळी पावसाच्या अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने महत्वाच्या निर्णयाच्या कार्यवाहीची माहिती मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत ट्विटदेखील केलं आहे.

सतत होणाऱ्या अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहे. मोठ्या नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना यामुळे करावा लागत आहे. शेतकऱ्यांची हीच अडचण ओळखून राज्य सरकारने दिलासादायक निर्णय घेतला आहे.

सततचा पाऊस हा नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर झाली असून यासंदर्भात नुकसानग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकर मिळण्यास मदत होईल.

मंत्रिमंडळ बैठकीतील इतर महत्वाचे निर्णय:

आयटीआय कंत्राटी निदेशकांचे मानधन आता २५ हजार रुपये करण्यात आलेले असून पूर्वीच्या मानधनात भरीव वाढ करण्यात आलीय. कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागासाठी हा निर्णय घेण्यात आला.

तसेच अकोला येथे नवीन पशू वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आलेले आहे.

यासह उद्योग विभागांतर्गत इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण, रेडिमेड गारमेंट उद्योग धोरणांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

मागासवर्गीय सहकारी गृहनिर्माण योजनेत इमारतींचे पुनर्विकास धोरण राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!