नाशिक (प्रतिनिधी) :– नाशिकमध्ये बिबट्यांचा अच्छाद अजूनही सुरू असून आज नाशिक तालुक्यातील मनोली गावामध्ये दोन छोट्या बछड्यांना बिबट्याने मारून टाकण्याची घटना समोर आली आहे तर दुसरीकडे इगतपुरीतील ताकेद येथे विहिरीत पडलेल्या एक वर्षीय बिबट्याला जीवदान देण्यात वनविभागाला यश आले आहे.

याबाबत वनविभागाच्या वतीने उपलब्ध झालेली अधिक माहिती अशी की, जिल्ह्यामध्ये सातत्याने बिबट्यांचा अच्छाद सुरू आहे. दोन दिवसापूर्वीच मामाच्या घरी आलेल्या गायत्री लिलके या सहा वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतरही बिबट्यांचे दर्शन होतच आहे. नाशिक तालुक्यातील मनोली या ठिकाणी देविदास दत्तात्रय गुळवे यांच्या शेतामध्ये पाच महिन्याच्या दोन छोट्या बछड्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या बिबट्याने हल्ला करून त्यांना ठार मारल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याबाबत पुढील कारवाई सुरू आहे.

दुसरी घटना इगतपुरी वनक्षेत्रातील मौजे टाकेद बुद्रुक येथे घडली आहे. या ठिकाणी एक वर्षीय नर बिबट्या विहिरीत पडला होता. त्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन करून विहिरीतून बाहेर काढले. त्याला वैद्यकीय तपासणी करून नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे, असे वन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.