लासलगाव (वार्ताहर) :- निफाड तालुक्यातील वेळापूर येथील वेळापूर ते ब्राह्मणगावला जोडला जाणाऱ्या रस्त्याची सतत पडणाऱ्या पावसामुळे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना तसेच शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी येथील स्थानिक शेतकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी केली आहे

वेळापूर ते ब्राम्हणगाव रस्ता हा ब्रिटिश कालीन असून या रस्त्याला राज्य क्रमांक प्राप्त झालेल आहे मात्र रस्त्याच्या या दयनीय अवस्थेमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे.रस्त्याच्या या स्थितीमुळे लहान शाळकरी मुलांना व शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या रस्त्याने सध्या दुचाकी सुध्दा जाऊ शकत नाही.या भागातील नागरिकांना व गरोदर स्त्रियांना दवाखान्यात जाणे व शेतकऱ्यांना शेतीमाल बाहेर काढणे मुश्किल झाले आहे.
या रस्त्याची तक्रार अनेक वेळा या भागातील शेतकऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींना व वेळापूर ग्रामपंचायतकडे केली असता या रस्त्याकडे गेल्या दहा वर्षापासून दुर्लक्ष करण्यात आले आहे.तरी सदर रस्त्याची सद्यस्थिती बघता स्थानिक लोकप्रतिनिधींनी तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक शाळकरी मुले तसेच वेळापूर सोसायटी चे चेअरमन आबा पालवे,बाजीराव शिंदे,भिकन शिंदे,शिवसेना विंचूर गण प्रमुख सुरज शिंदे,एड.केशव शिंदे व शेतकऱ्यांनी केली आहे