नाशिक (प्रतिनिधी) :– तक्रारीत नमूद मोटारसायकलीवर कारवाई करीत असताना सरकारी कामात अडथळा आणून कर्मचार्यास अरेरावी करणार्या बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी जमीर नूरखाँ तडवी (वय 44) हे मोटार वाहन निरीक्षक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी आहेत. काल सकाळी ते पखाल रोड येथे नाशिक आर्टिलरी पोर्टलवर प्राप्त होणार्या ऑनलाईन तक्रारीवर कारवाई करण्यासाठी गेले होते.
त्यावेळी तक्रारीत नमूद एमएच 15 जीवाय 7949 या क्रमांकाच्या वाहनावर कारवाई करीत असताना वाहनमालक तौसिफ बिलाल अत्तार व त्याचे वडील बिलाल अत्तार (दोघे रा. सम्राट रो-हाऊस, सात्त्विकनगर, मायरान शाळेजवळ, पखाल रोड, नाशिक) यांनी आपसात संगनमत करून फिर्यादी तडवी यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली, तसेच त्यांचा चष्मा व नेमप्लेट तोडून नुकसान केले.
त्याचप्रमाणे चालान व 3,750 रुपये दंडाची रक्कम भरली नाही व पावतीही स्वीकारली नाही म्हणून मुंबई नाका पोलीस ठाण्यात अत्तार बापलेकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिते करीत आहेत.