नाशिक (प्रतिनिधी) :- सी. ए. फायनल परीक्षेचा निकाल आज (दि. 15) लागला असून, नाशिकचा साहिल समनानी हा नाशिकमध्ये प्रथम, तर संपूर्ण भारताच्या गुणवत्ता यादीत 15 वा आला आहे. यामुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

सीए फायनल परीक्षा मे 2022 मध्ये झाली होती. तिचा निकाल आज घोषित झाला. यामध्ये संपूर्ण भारतातून एक लाख 18 हजार 771 विद्यार्थ्यांनी एकूण 489 केंद्रांवर परीक्षा दिली. पैकी संपूर्ण भारतात 12449 विद्यार्थी सीए उत्तीर्ण झाले. यात मुंबईचा मीत शहा हा संपूर्ण भारतामध्ये 80 टक्के गुण मिळवून पहिला आला.
66575 विद्यार्थ्यांनी प्रथम ग्रुपची परीक्षा दिली. या परीक्षेत 14643 विद्यार्थी यशस्वी झाले त्याची टक्केवारी 21.99 आहे. 63253 विद्यार्थ्यांनी द्वितीय ग्रुपची परीक्षा दिली. त्यात 13847 विद्यार्थी यशस्वी झाले. उत्तीर्णांची टक्केवारी 21.99 आहे. दोन्ही ग्रुप एकाच वेळेस देणारे 29348 विद्यार्थी होते. त्यापैकी 3695 म्हणजे 12.59 टक्के इतके विद्यार्थी यशस्वी झाले.
आज लागलेला सीएचा निकाल हा संपूर्ण नाशिककरांसाठी अतिशय अभिमानास्पद आहे. संपूर्ण भारतामध्ये रँक मिळवून विद्यार्थ्यांनी नवीन सीए करणार्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे. पूर्वी सीए करण्यासाठी विद्यार्थी मुंबई व पुणे या ठिकाणी जात असत; परंतु आज नाशिकमध्ये उत्कृष्ट मार्गदर्शन उपलब्ध असल्यामुळे बाहेरील जिल्ह्यातील विद्यार्थीसुद्धा नाशिकमध्ये येत आहे. मागील परीक्षेच्या तुलनेने निकाल हा वाढलेला आहे व तो नक्कीच सर्वांसाठी प्रेरणा देणारा आहे.
– प्रा. सीए. लोकेश पारख
पारख क्लासेस
सरचिटणीस नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस चालक संघटना