नाशिक (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या आवारात असलेले चंदनाच्या झाडाचे चार खोड अज्ञात चोरट्याने बुंध्यापासून कापून चोरून नेल्याची घटना घडली.

याबाबत माहिती अशी, की त्र्यंबक रोडवर महाराष्ट्र पोलीस अकादमी आहे. या अकादमीच्या आवारात असलेल्या कॅडेट मेसच्या पश्चिम बाजूला विहीर आहे. या विहिरीजवळ चंदनाची झाडे लावलेली आहेत. त्यापैकी सहा हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडाचा पाच ते सहा फूट लांबीचा मुख्य भाग, साडेचार हजार रुपये किमतीचा तीन ते चार फूट लांबीचा बुंधा, त्यानंतर साडेचार हजार रुपये किमतीचा चंदनाच्या झाडाचा तीन ते चार फूट लांबीचा मुख्य भाग, तसेच दोन हजार रुपये किमतीचे चंदनाचे झाड बुंध्यापासून कापलेले व जमिनीवर पडलेले अशा एकूण 17 हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडांची खोडे अज्ञात चोरट्याने दि. 27 व 28 जुलैच्या मध्यरात्री कधी तरी चोरून नेली.

या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात पोलीस नाईक नागनाथ दयानंद काळे यांच्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भिसे करीत आहेत.