नाशिक : कम्प्युटर असोसिएशन ऑफ नाशिक या संस्थेच्या वार्षिक सभेत अध्यक्षपदी संजय चावला तर उपाध्यक्षपदी संदीप लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली.
संगणक व्यावसायिकांसाठी कार्यरत असणाऱ्या कम्प्युटर असोसिएशन ऑफ नाशिक या संस्थेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या रौप्य महोत्सवी वर्षाची कार्यकारणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात अध्यक्षपदी संजय चावला, उपाध्यक्षपदी संदीप लोंढे ,सेक्रेटरीपदी सचिन शिंदे, खजिनदारपदी रश्मीन मजेठीया यांची तर कार्यकारिणी सदस्यपदी प्रमोद गायकवाड, शैलेश पाटील, किरण बोरसे, सचिन दुसाने, युवराज झोमन, सचिन साळुंखे, ललित राका, अमित पगारे आणि महेश देशमुख यांची निवड करण्यात आली.
संगणक आणि स्मार्टफोन हे आपल्या आयुष्याचे अविभाज्य भाग बनले आहेत. गेल्या दशकभरात संगणक क्षेत्रात प्रचंड क्रांती झाली आणि संगणक व्यापारही वेगाने वाढला. संगणक व्यवसाय हा मुख्यत्वे आंतरराष्ट्रीय व्यापार असल्याने व्यवसायातल्या अडीअडचणी, समस्या, ग्राहक सेवा याबरोबरच संगणक विक्रेत्यांचे वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यही सुखकर व्हावे यासाठी कम्प्युटर असोसिएशन ऑफ नाशिक या संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम सातत्याने राबविले जातात. कोरोना काळात तर अक्षरशः रात्रंदिवस सेवा देण्याच्या कामी संस्था आपल्या सदस्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी होती.
यंदा संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष संजय चावला यांनी दिली. सदस्यांना मानसिक स्वास्थ्याचे महत्व पटवून देणारा राष्ट्रीय योग दिवस संस्थेच्या वतीने नुकताच साजरा करण्यात आला. रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून संस्थेचा विस्तार, व्यवसाय वाढ आणि सदस्यांच्या हिताचे उपक्रम राबविण्यावर भर देणार असल्याचे यावेळी नूतन कार्यकारिणीने सांगितले. कम्प्युटर असोसिएशन ऑफ नाशिकच्या या नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.