संजय राऊत यांच्या कोठडीत “या” तारखेपर्यंत वाढ

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा):- शिवसेना खासदार संजय राऊत यांना कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे राऊत यांचा कोठडीतील मुक्काम वाढला आहे.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना 31 जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर पीएमएलए कोर्टात हजर केले असता त्यांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. आज ही कोठडी संपल्याने राऊत यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. अखेर कोर्टाने त्यांची कोठडी वाढवली. संजय राऊत चौकशीत सहकार्य करत नाहीत, असा आरोप ईडीने कोर्टात केला.

संजय राऊत यांना अटक केल्यानंतर ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली होती, पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केले. आठ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय? असा सवालही उपस्थित केला होता. त्यावर कोर्टाने ईडीची विनंती अमान्य करत त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली.

त्यानंतर ईडीने आज पुन्हा एकदा कोठडी 10 ऑगस्टपर्यंत वाढवून मागितली. परंतु संजय राऊत यांचे वकील अ‍ॅड. मनोज मोहिते जिरह यांनी ईडीच्या मागणीला विरोध केला. परंतु कोर्टाने त्यांची कोठडी 8 ऑगस्टपर्यंत वाढवली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!