साताऱ्याच्या पाटील बहीण-भावाचा MPSC परीक्षेत डंका

सातारा : सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मौजे शिरगाव येथील पृथ्वीराज पाटील आणि प्रियांका पाटील या सख्ख्या बहिण-भावंडांची महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामध्ये सहाय्यक अभियंता म्हणून निवड झाली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेत त्यांनी यश मिळवले.

असा साधला यशाचा मार्ग

पृथ्वीराज व प्रियांका हे दोघे बहिण-भावंडे मिळून दररोज दहा तास अभ्यास करत होते. दोघांनीही घरीच राहून एकत्र अभ्यास करून जिद्द व चिकाटीने हे यश संपादन केले आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई- वडिलांना दिले आहे. अभ्यासातील सातत्य महत्त्वाचे आहे. परीक्षेची डिमांड ओळखून त्यानुसार जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून अशा प्रकारच्या प्रश्नांच्या सराव चाचणी दिल्या. अशी एकच चाचणी न देता भरपूर सराव प्रश्नपत्रिका सोडविल्या. आपल्या चुका कोणत्या आहेत, ते बघून पुढची परीक्षा देण्यापूर्वी त्या झालेल्या चुका पाहणे आणि टाईम मॅनेजमेंट करणे या गोष्टी कटाक्षाने पाळल्या. सराव चाचणी दिल्यानंतर चुकलेल्या प्रश्नांबाबत आम्ही बहिण-भावंडे दोघे चर्चा करायचो आणि त्यानुसार एकमेकांच्या चुका सुधारत गेलो. भावाला पहिल्या प्रयत्नात एका मार्काने अपयश आले होते; परंतु हार न मानता दुसऱ्या परीक्षेची तयारी करून यश संपादन केले.

पृथ्वीराज पाटील यांची MSEB मधील महापारेषण विभागात सहाय्यक अभियंता म्हणूनही निवड झाली आहे. दुसऱ्या प्रयत्नात सोबत बहिणही होती आणि भावाच्या मार्गदर्शनामुळे बहिणीला पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले.

दररोज रात्री आम्ही दोघे आणि वडील शतपावली करायला जायचो, त्यावेळी दिवसभर केलेल्या अभ्यासाची वडिलांसोबत चर्चा करायचो आणि वडील आम्हाला मार्गदर्शन करायचे. आता दोन्ही मुलांना शासकीय अधिकारी बनविण्याचे वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असताना शैक्षणिक कर्ज काढून त्यांनी दोन्ही मुलांना इंजिनीयर बनवले होते.

पृथ्वीराज व प्रियांका दोघांचे शालेय शिक्षण यशवंतराव चव्हाण विद्यालय, यशवंतनगर येथून झाले. पृथ्वीराज यांनी व्ही.जे.टी.आय. मुंबईमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी. टेक. डिग्री संपादित केली आहे तर प्रियांका यांनी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड येथून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक.डिग्री संपादित केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२१ मध्ये त्यांना हे यश मिळाले. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दोघांनीही घरीच राहून एकत्र अभ्यास करून जिद्द व चिकाटीने हे यश संपादन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!