नाशिक (प्रतिनिधी) :- विज बिल माफ करावे आणि दुरुस्त करून मिळावे यासाठी म्हणून नाशिक जिल्ह्यातील सय्यद पिंपरी येथे संतप्त शेतकऱ्यांनी हाय व्होल्टेज टॉवरवर चढून आंदोलन केले आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यात लागोपाठ दुसऱ्या दिवशी देखील वीज बिल प्रश्नावरून शेतकऱ्यांचे आंदोलन झाले.

नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या वीजबिलांच्या प्रश्नावरून शेतकरी आणि वीज मंडळ यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. त्यातच आपली राजकीय भूमिका पार पाडण्यासाठी म्हणून सतत काही राजकीय पक्ष शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच आडगाव जवळ असलेल्या सय्यद पिंपरी या गावात शेतकऱ्यांना जादा वीज बिले सन २०१२ पासून देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना ही बिले कमी करून दिल्यास गावातील शेतकरी हे विज बिल भरण्यास तयार आहेत. परंतु वीज मंडळाच्या वतीने ही वीज बिले कमी करून दिली जात नाहीत आणि त्यातच मागील दोन-तीन दिवसांपासून या गावातील वीज कनेक्शन तोडण्याची भूमिका घेऊन वीज मंडळाने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले आहे.

यामुळे संतप्त झालेले काही शेतकरी वीज कनेक्शन जोडून मिळावे आणि वीज बिल दुरुस्ती करून मिळावे या मागणीसाठी म्हणून आज दुपारी गावातून जाणाऱ्या हाय व्होल्टेज टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले. या घटनेची वार्ता गावात पसरल्यानंतर तातडीने गावकऱ्यांनी या टॉवरकडे धाव घेतली आणि आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रत्यक्ष कारवाई व्हावी या मागणीसाठी म्हणून शेतकरी अडून बसले आणि यानंतर पोलीस तसेच विद्युत मंडळाचे अधिकारी, खा. हेमंत गोडसे, आ. देवयानी फरांदे यांनी या गावात धाव घेतली आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकरी तातडीने कारवाई करण्याची मागणी करत होते. ती न झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आपले आंदोलन चालूच ठेवले.
याबाबत बोलताना वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता टि. एस. घोडके यांनी सांगितले की, विज बिल दुरुस्ती करून देण्यासाठी विद्युत मंडळ तयार आहे परंतु यापूर्वी शासनाने आणलेल्या या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. आतापर्यंत 350 अर्ज दाखल झालेले आहे परंतु त्यासाठी ठराविक रक्कम भरवायची आहे. ती न भरल्यामुळे अडचण निर्माण येत आहे.
खा. हेमंत गोडसे यांनी सांगितले की, प्रथम विद्युत मंडळाने वीजबिलांची दुरुस्ती करून द्यावी आणि नंतर शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या योजनेमध्ये समाविष्ट करून घ्यावे म्हणजे हा प्रश्न तातडीने सुटेल. परंतु विद्युत मंडळ सहकार्य करीत नसल्याचा आरोप करून गोडसे म्हणाले की या सर्व बाबींकडे गांभीर्याने बघितले जात नाही, त्यामुळे हा प्रश्न सुटत नाही. कनेक्शन तोडल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे तातडीने जोडून देणे अशी मागणीही त्यांनी केली. आ. देवयानी फरांदे यांनी देखील या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकार हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. सातत्याने शेतकर्यांना त्रास होईल असेच वर्तन करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अंत पाहू नये अन्यथा शेतकरी राज्य सरकारला हिसका दिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शेतकरी संघटनेचे अनिल ढिकले यांनी सांगितले की, सय्यद पिंपरी या गावातील शेतकऱ्यांनी मागील दोन महिन्यापूर्वी वीज बिल दुरुस्त करून मिळावे म्हणून अर्ज दाखल केले आहेत. परंतु त्याची दखल न घेता वीज कनेक्शन तोडले जात आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर संतप्त झाले आहेत. आता द्राक्ष आणि जनावरांचा पिण्याच्या पाणी यांच्यासह पिकांचा प्रश्न देखील मोठ्या प्रमाणावर उभा राहिला आहे. तो सोडविण्यासाठी विजबिल तातडीने दुरुस्त करून विज कलेक्शन तातडीने चालू करावे अशी शेतकरी संघटनेची मागणी असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.