नाशिक (प्रतिनिधी) – इयत्ता पाचवीसाठी पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता 8 वीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा अतिवृष्टीमुळे पुढे ढकलण्यात आल्या असल्याची माहिती शिक्षण प्रशासनाधिकारी सुनिता धनगर यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे याचे मार्फत पाचवीसाठी पुर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता 8 वीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत असतात. या दोन्ही परिक्षा 20 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होत्या.
परंतु सद्यस्थितीत राज्यातील अनेक जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे उदभवलेली पुरसदृश्य स्थिती व बहुतांश ठिकाणी भुस्खलनामूळे वाहतुक बंद झाली आहे. यासर्व परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे सुरक्षेचा विचार करून या परिक्षा आता रविवार (दि. 31) रोजी घेण्यात येणार आहे. यापुर्वी निर्गमित करण्यात आलेले प्रवेशपत्र दिनांक 31 जुलै रोजी देखिल ग्राहय धरण्यात येईल असेही धनगर यांनी सांगितले आहे.