सप्तशृंगगडावरील “त्या” खुनाचा उलगडा; “या” कारणामुळे नात्यातील माणसानेच केला घात

कळवण (प्रतिनिधी) :- सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट येथे सुरक्षारक्षक पदावर कार्यरत असलेल्या अर्जुन पवार याच्या खुनाचा उलगडा पोलिसांनी केला असून प्रेमसंबंधातूनच हा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी नात्यातीलच रामदास पवार या संशयितास गजाआड करत त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

कळवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्तशृंग गडावरील स्थानिक असलेला अर्जुन पवार हा इसम काही वर्षांपासून सासुरवाडी भेंडी, ता. कळवण येथे राहत होता. सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्ट येथे तो सुरक्षारक्षक पदावर कार्यरत होता. कामानिमित्त तो भेंडी ते सप्तशृंगीगडावर दुचाकीवरून ये- जा करत असे. गेल्या मंगळवारी (दि. १२) सप्तश्रृंग गडावर रात्री ९ वाजेच्या सुमारास ड्यूटीवर जात असताना संशयित आरोपी रामदास पवार याने गडावरील धुके आणि पावसाची संधी साधून रात्री ८.३० वाजेच्या सुमारास गडावरील धबधब्याजवळ अर्जुन पवार याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. दरम्यान, सप्तश्रृंग गडावर दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांनी पोलीस स्थानकात घाटात जखमी अवस्थेत पडलेल्या युवकाबद्दल माहिती दिली. मात्र, गंभीर मार लागल्याने अर्जुन पवार याचा मृत्यू झाला होता.

वैद्यकीय अहवाल आल्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे निष्पन्न झाल्याने कळवण पोलीस निरीक्षक समाधान नागरे व त्यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासात धागेदोरे हाती लागल्यानंतर पोलिसांनी संशयित रामदास पवार याच्या मुसक्या आवळल्या. रामदास पवार याने मयत अर्जुनच्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्यामुळे व प्रेमात अडथळा ठरत असल्याने खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी संशयितास ताब्यात घेऊन कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कळवण पोलिसांनी संशयितास अटक केल्यानंतर त्यास न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मागदर्शनाखाली अपर अधीक्षक माधुरी कांगणे व पोलीस उप अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या सूचनांनुसार पथकाने तपास करत खुनाचा उलगडा करण्यात यश मिळविले.

कळवण पोलीस निरीक्षक समाधान नागरे, पोलीस उपनिरीक्षक महेश निकम, उपनिरीक्षक बबन पाटोळे, पोलीस कर्मचारी एस. आय. खाडे, हवालदार कोशिरे, ब्राह्मणे, गांगुर्डे, शरद शिंदे, योगेश गवळी, वर्षा निकम यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!